Join us   

थायरॉईड आहे तर प्या 5 प्रकारचे ज्यूस-औषधांसोबत करतील थायरॉईड कंट्रोल, इतर आजारही राहतील दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2022 4:19 PM

थायराॅइडच्या समस्येवर औषधांइतकेच काम करतात ज्यूसही! 5 प्रकारच्या ज्यूसेसमुळे थायराॅइडची समस्या होते कंट्रोल

ठळक मुद्दे थायराॅइडची समस्या नियंत्रित राहाण्यासाठी गाजर बीटाचं ज्यूस, भोपळ्याचं ग्रीन ज्यूस, काकडी लिंबाचं पाणी, हळकुंडाचं पाणी आणि सेलरीचं ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं.

बदललेल्या जीवनशैलीमुळे थायराॅइडशी निगडित समस्येचं प्रमाण पूर्वीपेक्षा वाढलं आहे. निरोगी आरोग्यासाठी थायराॅइड ग्रंथी नियंत्रित असणं महत्त्वाचं असतं. यासाठी औषधांसोबतच दिवसभरातल्या आहार विहाराचीही महत्वाची भूमिका असते. विशिष्ट फळं, भाज्या यासोबतच विशिष्ट  चार प्रकारच्या ज्यूसमुळेही थायराॅइडशी संबंधित समस्या नियंत्रणात राहाते.

Image: Google

गाजर-बीट ज्यूस

रोज एक ग्लास गाजर  बिटाचं ज्यूस प्याल्यानं थायराॅइडची समस्या नियंत्रित होते सोबतच शरीरातील लोहाचं प्रमाणही वाढतं. थायराॅइडच्या समस्येमुळे येणारा थकवा दूर होतो.  गाजर बिटाचं ज्यूस करण्यासाठी 1 गाजर, 1 बीट, थोडं अननस, 1 सफरचंद, थोड्या कोथिंबीरच्या काड्या घ्यावात.  ज्यूस करताना सर्व जिन्नस स्वच्छ धुवून घ्यावं. त्याचे छोटे छोटे तुकडे करावेत. ज्यूसर किंवा मिक्सरमधून ते बारीक करुन घ्यावे. तयार मिश्रण ग्लासमध्ये ओतावं आणि प्यावं.

Image: Google

भोपळ्याचं ग्रीन ज्यूस

भोपळ्याचं ग्रीन ज्यूस प्याल्यानं थायराॅइड समस्येसोबतच वजनही नियंत्रणात येतं. शरीराचा अशक्तपणा दूर होतो. या ज्यूसमुळे शरीराला ऊर्जा मिळते. भोपळ्याचं ग्रीन ज्यूस करण्यासाठी 1 मध्यम आकाराचा भोपळा, 10-12 पुदिन्याची पानं, अर्धा चमचा काळ मीठ घ्यावं. ज्यूस करताना भोपळ्याची सालं काढून भोपळा धुवून घ्यावा.  भोपळा बारीक चिरुन घ्यावा. ज्यूसर किंवा मिक्सरमधून त्याचा रस काढावा. हा रस एका ग्लासमध्ये काढवा. त्यात पुदिन्याची पानं वाटून त्याचा रस काढून तो घालावा. चव येण्यासाठी यात काळं मीठ घालावं. मीठ न घालता हा ज्यूस प्यायला तरी चालतो.

Image: Google

काकडी लिंबाचं पाणी

काकडी लिंबाचं पाणी करण्यासाठी 1 काकडी,2 लिंबं, पाव वाटी पुदिन्याची पानं, 3-4 ग्लास पाणी घ्यावं. यासाठी काचेची मध्यम आकाराची बरणी ( जार) घ्यावी.  बरणीत आधी स्वच्छ धुतलेली पुदिन्याची पानं हातावर रगडून घालावी. काकडी धुवून ती गोल चकत्या करुन चिरावी. लिंबंही गोल चिरुन् घ्यावेत.  काकडीचे काप आणि लिंबाचे काप बरणीत घालावेत. बरणीत पाणी घालावं. बरणी थोडी हलवून घ्यावी. रात्रभर बरणी फ्रिजमध्ये ठेवावी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या काकडी लिंबाचं हे पाणी गाळून प्यावं. हे पाणी चवीनं आणि गुणानं उत्तम असतं.

Image: Google

हळकुंडाचं पाणी

हळद पावडरपेक्षा हळकुंडं हे जास्त गुणकारी असतं. हळदीमध्ये ॲण्टिसेप्टिक, जीवाणूरोधक, ॲण्टिऑक्सिडण्ट आणि ॲंटीव्हायरल गुणधर्म असतात. हळद सेवन केल्यानं ॲण्टिऑक्सिडेण्ट मिळतात. शरीरावरची सूज कमी होते. थायराॅइड ग्रंथीचं काम व्यवस्थित होण्यास चालना मिळते. हळकुंडाचं पाणी करण्यासाठी पाण्यात हळकुंडं उकडावं. पाण्याला जर्द पिवळा रंग येईपर्यंत आणि पाणी आटेपर्यंत ते उकळू द्यावं. गॅस बंद केल्यावर त्यात थोडं काळ्ं मीठ घालून ते प्यावं. रोज सकाळी हळकुंडाचं पाणी पिणं थायराॅइड नियंत्रणासाठी उत्तम असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

Image: Google 

सेलरी ज्यूस

ॲण्टिऑक्सिडण्टसयुक्त सेलरी ज्यूसमधील गुणधर्मांमुळे थायराॅइडचं काम उत्तम चालण्यास मदत मिळते. सेलरी ज्यूस प्याल्यानं रक्तातील ॲसिड वाढून त्यामूळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि थायराॅइडचं काम सुरळीत होण्यास चालना मिळते. या ज्यूसमुळे किडनी आणि लिव्हरचं कामही सुरळीत चालतं. सेलरी ज्यूस सेवन केल्यानं पचनाशी निगडित समस्या दूर होतात. चयापचय क्रिया सुधारते. रोज सकाळी रिकाम्या पोटी सेलरी ज्यूस प्याल्यानं शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.  

सेलरी ज्यूस करण्यासाठी सेलरीची एक जूडी, 1 सफरचंद, 1 मध्यम आकाराची काकडी घ्यावी. ज्यूस करण्यासाठी सेलरी निवडून धुवून घ्यावी.  सफरचंदाचे चार मोठे तुकडे करावेत. काकडीही चिरुन घ्यावी. ज्यूसर किंवा मिक्सरमधून ते बारीक करुन घ्यावं. वाटलेलं मिश्रण ग्लासमध्ये काढून ते प्यावं. ज्यूस केल्यानंतर ते लगेच संपवावं. कारण जास्त वेळ ठेवल्यास त्यातील फायदेशीर घटक नाश पावतात. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना