Join us   

‘व्हिटॅमिन डी’ सतत आणि जास्त प्रमाणात घेतलं तर, सावधान तब्येत बिघडण्याचा धोका आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2022 9:19 AM

Side Effects of Excess Vitamin D Tablets : कोणतेही व्हिटॅमिन सप्लिमेंट -गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंच घ्यायला हवे, मनानंच घेऊ नये.

ठळक मुद्दे व्हिटॅमिन डी चे प्रमाण जास्त झाले तर ही डोकेदुखीने हैराण व्हायला होते.शरीरात डी व्हिटॅमिन जास्त झाले तर साहजिकच कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि कॅल्शियम वाढले तर कि़डनी स्टोन होतो. 

हाडे दुखणे, प्रतिकारशक्ती कमी होणे, त्वचा आणि केसांच्या समस्या अशा अनेक गोष्टींसाठी व्हिटॅमिन डीची(Vitamin D) कमतरता हे मुख्य कारण असते. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डी चा मुख्य स्त्रोत. उष्ण कटिबंधात आपला देश असूनही अनेकांच्या शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता असते. शरीरात पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी नसले तर शरीरात कॅल्शियम शोषून घेण्याच्या कार्यात अडथळा येतो आणि शरीरामध्ये कॅल्शियमचीही कमतरता उद्भवते (Vitamin D Supplements). त्यामुळे सकाळी कोवळ्या उन्हामध्ये बसण्याचा सल्ला डॉक्टर वारंवार देतात. (Side Effects of Excess Vitamin D Tablets).

(Image : Google)

भारतात जवळपास ७६ टक्के लोकांना व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्याचे आढळून आले आहे. यावर उपाय म्हणून व्हिटॅमिन डीची औषधे घेतली जातात. काही वेळा ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली जातात तर काही वेळा कोणत्याही सल्ल्याशिवाय घेतली जातात. मात्र व्हिटॅमिन डी औषधांच्या स्वरुपात जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचे शरीरावर काही विपरित परीणाम दिसून येतात.  ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये अलिकडेच एक केस स्टडी प्रसिध्द झाली, त्यानुसार व्हिटॅमिन डी सप्लीमेण्ट अतीप्रमाणात घेणंही आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणापेक्षा ८० वेळा जास्त व्हिटॅमिन डी घेतल्यानं एका व्यक्तीच्या मृत्राशयावर परिणाम झाल्याचे हा अभ्यास सांगतो. अर्थात हा काही अपवाद नव्हे, आजवर अनेक अभ्यास अती प्रमाणात व्हिटॅमिन डी सप्लीमेण्ट घेण्यासंदर्भात धोक्याचा इशारा देत आहेत.

अती आणि सतत हे औषध घेतले तर..

१. पोटाच्या समस्या 

व्हिटॅमिन डी आरोग्यासाठी उपयुक्त असले तरी ते जास्त प्रमाणात घेतल्यास पोटाच्या समस्या निर्माण होतात. काही वेळा यामुळे गॅसेस, अपचन, जुलाब होणे अशा तक्रारी उद्भवतात. त्यामुळे व्हिटॅमिन डीचा डोस डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणातच घ्यायला हवा. 

२. मळमळ, उलट्या 

व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात घेतले गेले तर त्यामुळे अस्वस्थता येण्याची शक्यता असते. अशावेळी मळमळ होणे, उलट्या होणे अशी लक्षणेही दिसू शकतात. एकाएकी आपल्याला असा त्रास व्हायला लागला तर तो कशामुळे होतो हे आपल्या लक्षात येत नाही. मात्र व्हिटॅमिन डीमुळे हा साईड इफेक्ट होऊ शकतो. 

३. किडनी स्टोन

किडनी स्टोन ही शरीरात अनावश्यक घटक जास्त प्रमाणात जमा झाल्यास उद्भवणारी एक महत्त्वाची समस्या आहे. यामुळे किडनीच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. शरीरात डी व्हिटॅमिन जास्त झाले तर साहजिकच कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि कॅल्शियम वाढले तर कि़डनी स्टोन होतो. 

(Image : Google)

४. डोकेदुखी 

डोकेदुखी ही आपल्याला सामान्य वाटणारी समस्या असली तरी त्यामागे काही ना काही कारणे असतात. काही वेळा शरीरातील काही घटक कमी झाल्याने तर काही वेळा काही घटक वाढल्याने डोकेदुखीची समस्या उद्भवते. व्हिटॅमिन डी चे प्रमाण जास्त झाले तर ही डोकेदुखीने हैराण व्हायला होते.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स