Join us   

कोरोनाकाळात प्रतिकारशक्ती मजबूत हवी तर आहारात हव्याच ५ गोष्टी; खा रोज नियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2022 3:47 PM

संतुलित आहार हा आरोग्य उत्तम ठेवण्याचा आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याचा एक सर्वात महत्त्वाचा उपाय आहे.

ठळक मुद्दे कोविडसारख्या आजारापासून स्वत:ला वाचवायचे असेल तर प्रतिकारशक्ती उत्तम हवीआहार हा जीवनशैलीतील सर्वात महत्त्वाचा घटक असून त्याची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे

कोरोनाची प्रकरणे दिवसागणिक वाढत असताना आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे आणि परिस्थितीचा सकारात्मकतेने सामना करणे याच गोष्टी आपल्या हातात आहेत. मास्कचा वापर, सॅनिटायजर, दोन व्यक्तींमध्ये पुरेसे अंतर ठेवणे, हात धुणे यांसारख्या गोष्टी केल्या तरीही कोरोना नावाचा विषाणू काही आवरते घ्यायला तयार नाही. सतत नवनवीन वेश धारण करत हा विषाणू आपल्यापर्यंत येतच आहे. त्यामुळे आपली तब्येत चांगली ठेवायची असेल तर जीवनशैली चांगली असणे आवश्यक आहे. तब्येत चांगली ठेवायची असेल तर पुरेशी झोप, व्यायाम, ताणरहित जीवन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताजा आणि समतोल आहार या गोष्टींची आवश्यकता असते. आपले आरोग्य चांगले असेल तर कोणत्याही प्रकारच्या विषाणूशी ते अतिशय चांगल्या पद्धतीने सामना करु शकते. तेव्हा कोरोना आणि त्यासारख्या इतर संसर्गजन्य आजारांशी लढायचे असल्यास आहारात खालील गोष्टींचा समावेश असायलाच हवा.

१. फळे 

थंडीच्या दिवसांत बाजारात अतिशय चांगली फळे उपलब्ध असतात. फळांमध्ये ग्लुकोज, फायबर, व्हिटॅमिन सी आणि संसर्गजन्य आजारांशी सामना करणारे अनेक उपयुक्त घटक असतात. याशिवाय संत्री, मोसंबी, द्राक्षे, अननस यांसारख्या पाणीदार फळांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण चांगले राहण्यास मदत होते. आपल्याला संसर्गजन्य आजारांशी सामना करायचा असेल तर शरीरात पाण्याचे प्रमाण चांगले असणे अतिशय गरजेचे असते. मधल्या वेळात जेव्हा आपल्याला भूक लागते आणि काय खावे ते कळत नाही अशावेळी फळे खाणे केव्हाही चांगले. नाश्ता झाल्यानंतर साधारण ११ च्या दरम्यान, दुसारच्या जेवणानंतर साधारण ५ वाजताच्या दरम्यान तुम्हाला काहीतरी तोंडात टाकावे असे वाटते. तेव्हा फळे हा उत्तम पर्याय ठरु शकतो. 

(Image : Google)

२. भाज्या 

भाज्यांमधून शरीराला महत्त्वाची जीवनसत्वे, खनिजे आणि इतरही आवश्यक घटक मिळतात हे आपल्याला माहित आहे. यातही पालेभाज्या, फळभाज्या, सॅलेड अशा गोष्टींचा समावेश होतो. या सगळ्या गोष्टी आपल्या आहारात पुरेशा प्रमाणात असायला हव्यात. भाज्यांमध्ये असणारे पोषक घटक आपल्याला आजारपणानंतर अशक्तपणा आला असेल तर तो भरुन काढण्यासही उपयुक्त ठरतात. थंडीत बाजारात भरपूर आणि ताज्या भाज्या उपलब्ध असल्याने आहारात भाज्यांचा जास्तीत जास्त समावेश असायला हवा. भाज्यांचा जास्तीत जास्त वापर केल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. 

(Image : Google)

३. बियांचे प्रकार

यामध्ये सुकामेवा आणि विविध बियांचा समावेश होतो. बियांमध्ये सेलेनियम, झिंक, प्रथिने, व्हिटॅमिन इ, बी ६ हे घटक असतात. बदाम, ब्राझील नट, आक्रोड, मगज बिया यांतून भरपूर प्रमाणात प्रथिने मिळतात. तर सुकामेव्यातील बऱ्याच घटकांमध्ये अँटीऑक्टीडंटसचे प्रमाणही भरपूर असते. त्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यासाठी त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. तुम्हाला प्रतिकारशक्ती चांगली ठेवायची असले तर आहारात सुकामेव्याचा वापर आवर्जून करायला हवा. 

(Image : Google)

४. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ 

दूधाचे पदार्थ म्हणजे दही, ताक, बटर, तूप यांसारख्या गोष्टींचा आहारात पुरेसा समावेश असायला हवा. या सर्व घटकांमुळे शरीराला उर्जा तर मिळतेच पण रक्तातील साखरेची पातळीही वाढत नाही. आतड्यांमध्ये असणारे चांगल्या बॅक्टेरीयांचा वाढ होण्यास यामुळे मदत होते. शरीरातील सर्व क्रिया सुरळीत ठेवायच्या असतील तर चांगले बॅक्टेरीया आणि वाईट बॅक्टेरीया या दोघांचेही प्रमाण योग्य असणे आवश्यक असते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे प्रमाण चांगले असल्याने त्याचा शरीराला अतिशय चांगला फायदा होतो.

(Image : Google)

५. इतर घटक

याबरोबरच सर्व प्रकारची धान्ये, डाळी, कडधान्ये यांसारख्या घटकांचाही आहारात योग्य प्रमाणात समावेश हवा. ठराविकच धान्ये, डाळी खाल्ल्याने शरीराचे योग्य पद्धतीने पोषण होत नाही. त्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली ठेवायची असेल तर योग्य प्रमाणात, ताजा आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना