सकाळी उठल्यावर आपण सगळेच ब्रश करतो. पण त्यासोबतच रात्री झोपताना ब्रश करणे तोंडाच्या आणि एकूणच आरोग्यासाठी अतिशय गरजेचे असते. दिवसभर आपण जे अन्न खातो त्याचे कण आपल्या दातांमध्ये तसेच राहतात. रात्री झोपताना ब्रश न करता झोपलं तर मात्र दातांचे, तोंडाचे आणि एकूणच आरोग्य बिघडते. अन्नाचे कण दातांमध्ये अडकून रात्रभर तसेच राहील्याने दात किडतात. एकदा दातांचे दुखणे सुरू झाले की मग किड काढणे, रुट कॅनाल त्याचाही उपयोग नसेल तर कॅप बसवणे नाहीतर दात काढून टाकणे असे सगळे करावे लागते. दातांचे दुखणे सहन न होणारे असते तसेच या सगळ्या उपचारांचा खर्चही जास्त असतो. इतकेच नाही तर रात्री झोपताना दात न घासल्याने याशिवायही काही गंभीर आजार उद्भवू शकतात. पाहूयात हे आजार कोणते (Importance of Brushing Teeth)...
१. डायबिटीस
जे लोक नियमितपणे दिवसातून ३ वेळा ब्रश करतात त्यांच्यामध्ये टाईप २ डायबिटीसचा धोका कमी असतो. तसेच ज्या लोकांना दातांचे दुखणे आहे किंवा बरेच दात पडलेले आहेत त्यांना डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे नियमितपणे दिवसांतून किमान २ ते ३ वेळा दात घासणे आणि स्वच्छ ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे.
२. हृदयरोग
युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटीव्ह कार्डीऑलॉजीमध्ये एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला होता. त्यानुसार, जे लोक दिवसातून कमीत कमी ३ वेळा ब्रश करतात त्यांना अॅट्रीयल फाइब्रिलेशनची समस्या भेडसावत नाही. म्हणजेच हृदयामध्ये किंवा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होत नाहीत. तसेच जास्त वेळा ब्रश केल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही कमी असते.
३. कॅन्सर
कॅन्सर होण्यासाठी सिगारेट ओढणे हे एकच कारण नसून तोंडाची स्वच्छता, हिरड्यांच्या समस्या यांमुळेही तोंडाचा आणि पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. नियमित दात न घासल्याने कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवसातून किमान २ वेळा आवर्जून ब्रश करायला हवा असा सल्ला तज्ज्ञ देतात. तोंडात किंवा पोटात अल्सर होणे हे रात्री झोपताना दात न घासण्याचे मुख्य कारण असू शकते.