रात्रभर पुरेशी झोप होण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते हे आपण अनेकदा ऐकतो. त्यानुसार आपण किमान ७ ते ८ तास झोप घेण्याचा प्रयत्नही करतो. पण ही झोप आपण कोणत्या वेळेला घेतो हेही तितकेच महत्त्वाचे असते. गेल्या काही वर्षांत शहरांत आणि ग्रामीण भागातही झोपेच्या वेळा बदलल्याने रात्री १२ नंतर झोपण्याची पद्धत सुरू झाली आहे. कधी घरातल्या जबाबदाऱ्या, ऑफीसच्या वेळा यांमुळे तर कधी मित्रमंडळी आणि हातात सतत असणारा मोबाइल आणि सोशल मीडिया यामुळे झोपण्याची पूर्वी ९ किंवा १० असणारी वेळ आता थेट १२- १ पर्यंत गेली आहे. त्यामुळे ७ ते ९ तास झोपलं तरी झोप पूर्ण न होण्यामागे झोपेची वेळ हे एक महत्त्वाचे कारण असू शकेल का? तर हो हेल्थ कोच शिवांगी देसाई यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले असून झोप पूर्ण न होण्यामागे झोपेची चुकीची वेळ हेच महत्त्वाचे कारण आहे (Importance of Sleeping on Time & its Benefits).
रात्री झोपण्यासाठी कोणती वेळ योग्य?
रात्री १० ते २ ही आपल्या झोपेच्या वेळेतली सगळ्यात महत्त्वाची वेळ असते. या काळात आपल्या शरीराचे सर्वात जास्त हिलिंग होते. या काळात आपल्या शरीरात तयाह होणारे हार्मोन्स आपल्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर असतात. त्यामुळे किमान १० ते ११ च्या दरम्यान झोपायलाच हवे. अनेकदा आपण काही ना काही कारणाने उशीरा झोपतो आणि उठतोही उशीरा. त्यामुळे उशीरा झोपलो तर काय झालं माझी ७-८ तासांची झोप पूर्ण झाली आहे असं आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्षात ती झोप चुकीच्या वेळी घेतलेली असल्याने ती शरीराचा थकवा घालवण्यासाठी पुरेशी नसते. १२-१ ला झोपून सकाळी ८-९ ला उठलो तर आपल्याला शरीरात ताकद कमी असल्यासारखे वाटते, सतत काहीतरी खावेसे वाटते, कामावर लक्ष केंद्रित करु शकत नाही आणि एकप्रकारचा आळस येतो.
यासाठीच आपल्या झोपेचे नेमके शेड्यूल तयार करुन नियमितपणे त्याच वेळेला झोपायला हवे. म्हणूनच फक्त झोप घेणे गरजेचे नाही. तर योग्य वेळेला, योग्य पद्धतीने घेतलेली झोप ही शरीरासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाची असते. किती झोपतो यापेक्षा कधी झोपतो हे जास्त महत्त्वाचे आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. लहान मुलांना आणि ज्येष्ठ मंडळींना वेळच्या वेळी झोपण्याचा सल्ला कायमच दिला जातो. जेणेकरुन योग्य वेळी झोपल्याने त्यांचा थकवा दूर होईल.