Join us   

फळं खाताना लक्षात ठेवा ४ महत्त्वाच्या गोष्टी, त्याच फळांतून मिळेल दुप्पट पोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2024 11:48 AM

Important Rules of having fruits : फळं खाताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी

आपण आहारात धान्य, डाळी, कडधान्य, दुग्धजन्य पदार्थ, भाज्या, फळं यांचा समावेश करतो. यातील प्रत्येक घटक आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने आहार संतुलित असेल तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. दिवसभराच्या आहारात फळांचा आवर्जून समावेश असायला हवा असं आपल्याला वारंवार सांगितलं जातं. त्यामुळेच आपण आहारात विविध चवीच्या, रंगांच्या फळांचा समावेश करतो. फळांमध्ये असणारे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने त्यांचा आहारात समावेश करायला हवा. दिवसातून किमान २ फळं आवर्जून खायला हवीत असं म्हटलं जातं. फळं खाताना काही किमान नियम लक्षात ठेवले तर या फळांचा शरीराला फायदा होतो. नियमाच्या विरुद्ध फळं खाल्ल्यास आरोग्याला त्रास होण्याचीही शक्यता असते.पाहूयात फळं खाताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी ज्यामुळे जास्त पोषण मिळण्यास मदत होईल (Important Rules of having fruits). 

१. ज्यूस नको कारण..

आपण नुसते फळ खातो तेव्हा १ किंवा जास्तीत जास्त २ फळं खातो. पण ज्यूस करतो त्यावेळी आपण एकापेक्षा जास्त फळांचा वापर करतो. असा ज्यूस प्यायल्यास आपल्या शरीरातील कॅलरीज वाढतात. इतकेच नाही तर ज्यूसमुळे रक्तातील साखरही बऱ्याच प्रमाणात वाढते. पण आपण फळ चावून खातो तेव्हा ते लाळेसोबत आत जाते त्यामुळे त्यातील पोषण जास्त प्रमाणात मिळण्यास मदत होते आणि ते पचायला सोपे होते. 

२. वेगळी फळं सोबत नको

काही जणांना फ्रूट डीश किंवा एकावेळी २ ते ३ वेगळी फळं खाण्याची सवय असते. पण वेगळ्या चवीची २ फळं एकत्र खाऊ नयेत.याचं कारण म्हणजे प्रत्येक फळ पचवण्यासाठी शरीराला वेगवेगळ्या एन्झाइम्सची आवश्यकता असते. गोड आणि आंबट फळं कधीच एकत्र खाऊ नयेत. 

३. बराच काळ कापून ठेवलेली फळं नको

काहीवेळा आपण सोय म्हणून फळं चिरुन ठेवतो आणि काही तासांनी ती खाण्याचा प्लॅन करतो, पण असे करणे योग्य नाही. कापलेल्या फळांचा हवेशी संपर्क आल्याने त्यातील पोषण हळूहळू कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ऐनवेळी फळं कापून खावीत.

४. स्थानिक फळं खावीत

आपण ज्या भागात राहतो त्या भागात पिकणारी, मिळणारी फळं आवर्जून खायला हवी. कारण आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणात आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी प्रामुख्याने पिकतात. त्यामुळे स्थानिक फळं खाणं जास्त चांगलं.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सफळे