तेल हा आपल्या स्वयंपाकातील एक महत्त्वाचा जिन्नस आहे. कोणत्याही पदार्थाला फोडणी देण्यासाठी, कणीक मळण्यासाठी किंवा एखादा पदार्थ तळण्यासाठी आपण तेल वापरतोच. तेल हा आहारातील महत्त्वाचा घटक असून शरीराला स्निग्धता मिळण्यासाठी तो आवश्यक असतो. पण तो जास्त झाला तर कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा यांसारख्या समस्या निर्माण होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे तेलाचा वापर जपून करायला हवा असे वारंवार आहारतज्ज्ञांकडून सांगण्यात येते. साधारणपणे आपण घरात किराणा सामान भरताना १ किंवा २ प्रकारचे तेल आणतो आणि सगळ्या गोष्टींसाठी तेच तेल वापरतो (Important tips about using oil for cooking).
पण असे करण्यापेक्षा पदार्थाच्या प्रकारानुसार तेलाचा वापर करणे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असते. पोळीला वरुन लावण्यासाठी, भाजी-आमटीच्या फोडणीसाठी, तळण्यासाठी कोणत्या प्रकारचं तेल वापरलेलं जास्त चांगलं याविषयी आपण फारसा विचार केलेला नसतो. प्रसिद्ध शेफ पंकज भदौरीया विविध पदार्थांच्या रेसिपी सांगण्याबरोबरच स्वयंपाकाशी निगडीत काही महत्त्वाच्या टिप्सही शेअर करतात. पाहूयात कोणत्या पदार्थासाठी त्या कोणते तेल वापरायला सांगतात...
१. पोळी किंवा फुलके करतो त्याला साजूक तूप लावावे. अनेकदा आपण पराठा करताना त्याला तव्यावरच तेल किंवा तूप लावतो, तसे न करता पराठा खाली काढल्यानंतर त्याला तूप लावायला हवे.
२. भाजी, आमटी किंवा कोणत्याही पदार्थाला फोडणी देण्यासाठी मोहरीचं तेल, शेंगादाण्याचं तेल किंवा तीळाचं तेल वापरावं.
३. तसंच दररोज न चुकता १ चमचा नारळाचं तेल आहारात असायला हवं. तसंच ही सगळी तेलं कोल्ड प्रेस म्हणजे घाण्यावरची असायला हवीत. आपण बहुतांशवेळा रीफाईंड ऑईल वापरतो पण घाण्याचं तेल आरोग्यासाठी केव्हाही जास्त चांगले असते.
४. तुम्हाला ऑलिव्ह ऑईल खायचं असेल तर पदार्थ शिजवण्यासाठी, सॅलेड किंवा आणखी कशावर वरुन घालण्यासाठी याचा वापर करा. आरोग्य उत्तम ठेवायचं तर तेलाचा योग्य पद्धतीने वापर करायला हवा.