आपण आपल्या आरोग्याकडे, सौंदर्याकडे पुरेसं लक्ष देतो. मात्र आपल्या दातांकडे आपण म्हणावं तितकं लक्ष देत नाही. सकाळी उठल्यावर सवय म्हणून आपण दात घासतो खरे पण हे दात दिर्घकाळ मजबूत राहावेत, कमी वयात किडू नयेत, तोंडाला वास येऊ नये म्हणून आपण विशेष कोणतीच गोष्ट करत नाही. मात्र अशाप्रकारे दातांकडे दुर्लक्ष करणे आपल्याला महागात पडते आणि कमी वयात दातदुखी, दातांना लागलेली कीड आणि मग त्यावर करावे लागणारे महागडे उपचार या चक्रात आपल्याला अडकावे लागते (Important tips for Healthy Teeth and gums).
पण असे होऊ नये आणि दात वय वाढलं तरी पांढरेशुभ्र आणि मजबूत राहावेत यासाठी काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात. केवळ ब्रश करणे हे दात स्वच्छ आणि मजबूत राहण्यासाठी पुरेसे नसते. दात नीट साफ नसतील तर ते कमजोर व्हायला लागतात. त्याचा आपल्या पचनक्रियेवरही परीणाम होतो. म्हणूनच आज आपण डॉ. मानवी श्रीवास्तव यांनी दात मजबूत होण्यासाठी आवश्यक असलेल्या काही टिप्स शेअर केल्या आहेत त्या समजून घेणार आहोत.
१. दात घासणे आणि फ्लॉसिंग करणे
दात मजबूत आणि हेल्दी राहावेत तसेच किटाणूंपासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी दिवसातून किमान २ वेळा ब्रश करायला हवा. हिरड्यांना इजा होणार नाही असा सॉफ्ट ब्रश वापरायला हवा. फ्लोराइड टूथपेस्ट वापरावी ज्यामुळे दातांवर असलेल्या इनॅमलला प्रोटेक्शन मिळते. फ्लॉसिंग केल्याने दातांच्या मध्ये अडकलेले कण निघण्यास मदत होते.
२. दातांनी बाटल्या, पिशव्या फोडू नयेत
अनेकदा आपण दातांनी बाटली, सोडा कॅन किंवा वेफर्सचे पाकीट फोडण्याचा प्रयत्न करतो. मात्र यामुळे दातांचे नुकतान होते हे लक्षात घ्यायला हवे. तसेच तुम्ही एखादा गेम खेळत असाल तर माऊथ गार्ड घालणेही अतिशय महत्त्वाचे असते त्यामुळे दात सुरक्षित राहण्यास मदत होते. याशिवाय जास्त गोड पदार्थ आणि कार्बोनेटेड ड्रींक्स पिऊ नयेत.
३. भरपूर पाणी प्या
दातांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी पाणी भरपूर पिणे आवश्यक असते. यामुळे तोंडीतील बॅक्टेरीया पोटात जातात आणि त्यातील चांगले बॅक्टेरीया आतड्यांसाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे शरीरातील अनावश्यक टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. याशिवाय योग्य प्रमाणात पाणी प्यायले तर दात किडणे, तोंडाचा दुर्गंध आणि कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.
४. कॅल्शियम रीच डाएट घेणे आवश्यक
दातांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी कॅल्शियम रीच डाएट घेणे गरजेचे असते. यासाठी आहारात दूध, डेअरी उत्पादने, फळं, भाज्या यांचा समावेश वाढवावा. दातांची कोणतीही समस्या निर्माण झाली तरी त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करायला हवेत.