Join us   

व्हजायनल हेल्थसाठी ४ महत्वाच्या टिप्स, स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात नाजूक भागाची काळजी कशी घ्याल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 11:44 AM

Important Tips for Vaginal Cleaning According to Gynecologist : हल्ली योनीमार्गाच्या भागात सतत फोड, पुरळ येण्याच्या तक्रारी घेऊन बऱ्याच महिला व मुली स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जातात.

ठळक मुद्दे दिवसातून एकदा जास्तीत जास्त दोन वेळा सध्या पाण्याने स्वच्छता (साबण नको) पुरेशी आहे.वेळेत निदान आणि योग्य उपचार झाले तर पुढचे गंभीर त्रास टळतात, अन्यथा या समस्या वाढण्याचीच शक्यता जास्त असते.

शरीरावर केस असणे म्हणजे अस्वच्छपणाचे लक्षण असते. केस काढले की आपण स्वच्छ राहतो असा अनेकींचा समज असतो. त्यामुळे काखेतले, हाताचे, पायाचे केस नियमितपणे व्हॅक्सिंग करुन काढले जातात. सौंदर्याच्यादृष्टीने एकवेळ हे ठिक आहे. पण स्वच्छतेच्या नावाखाली आणि फॅशन म्हणून हल्ली व्हजायनल व्हॅक्सिंग करण्याचे प्रमाणही वाढले आहे. अनेकदा स्त्रिया रेझरने याठिकाणचे केस काढतात. इतकेच नाही तर घरच्या घरी किंवा पार्लरमध्ये जाऊन व्हजायनाचे रितसर व्हॅक्सिंग केले जाते. याशिवाय बाजारात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या उत्पादनांनी व्हजायना स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र असे करणे आरोग्यासाठी खरंच योग्य असते का? त्यामुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात (Important Tips for Vaginal Cleaning According to Gynecologist). 

(Image : Google)

हल्ली योनीमार्गाच्या भागात सतत फोड,पुरळ येण्याच्या तक्रारी घेऊन बऱ्याच महिला व मुली स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जातात. या समस्यांची बरीच कारणे असली तरी या भागाची स्वच्छता न ठेवणे किंवा अती स्वच्छता करणे ही २ यामागील महत्त्वाची कारणे असतात. बरेचदा व्हजायनाला खाज येणे, पुरळ येणे, आग होणे अशा समस्या उद्भवतात. अशावेळी नेमके काय करावे हे माहित नसल्याने आपण त्याकडे बरे होईल म्हणून दुर्लक्ष करतो. पण या भागात खाजवल्यानंतर त्याठिकाणचे इन्फेक्शन जास्त वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे या समस्या उद्भवू नयेत आणि आपले आरोग्य तसेच वैवाहिक जीवन सुखाचे राहावे यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात याविषयी प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. 

१. योनीमार्गाच्या आजूबाजूच्या केसांचे शेविंग किंवा व्हॅक्सिंग करु नये. त्यामुळे केसांची मुळे उघडी पडून जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. तसेच या भागात हेअर रिमूव्हर वापरणेही धोकादायक आहे. त्याऐवजी आपण कात्रीने याठिकाणचे केस बारीक करु शकतो.

२. कोणताही दुखणारा फोड या भागात आल्यास स्त्रीरोग तज्ज्ञांना लगेच दाखवून घ्यावे. वेळेत निदान आणि योग्य उपचार झाले तर पुढचे गंभीर त्रास टळतात, अन्यथा या समस्या वाढण्याचीच शक्यता जास्त असते.

(Image : Google)

३. योनीमार्ग सतत साबण, गरम पाणी, हॅण्ड शॉवरने धुतला तर तो स्वच्छ राहतो असे अनेकींना वाटते, मात्र सतत धुण्याची आवश्यकता नसते. 

४. सध्या स्त्रिया आणि मुलींमध्ये योनीमार्गाची स्वच्छता करण्यासाठी वेगवेगळे "intimate wash" वापरण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे.यामुळे वारंवार योनीमार्गात कोरडेपणा आणि संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढलेच आहे. याचे कारण असे की योनीमार्गाचा आतला भाग अॅसिडीक असतो म्हणून हे वॉश अॅसिडीक बनवले जातात पण ह्या वॉशने योनीमार्गाचा बाहय भाग धुतला जातो,आतला नव्हे आणि ते योग्यही नाही. या असिडीक वॉशमुळे बाहेरच्या भागातील त्वचा दुखावली जाऊन हुळहुळी होते. योनीमार्गात वेगवेगळे चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे जीवजंतू असतात.या वॉशमुळे त्याचे संतुलन खराब होते परिणामी योनीमार्गाची प्रतिकारशक्ती कमी होऊन वारंवार संसर्ग आणि कोरडेपणा याचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे ह्या वॉशची अजिबात गरज नाही. दिवसातून एकदा जास्तीत जास्त दोन वेळा सध्या पाण्याने स्वच्छता (साबण नको) पुरेशी आहे.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स