नवीन वर्ष म्हणजे नवे अनुभव, नवे नियम.. पण म्हणून जुने चांगले नियम सोडून द्यायचे असं नाही. नवीन वर्ष सुरु झालं तरी आपलं आरोग्य राखणं ही जबाबदारी आपल्यावर कायम असणार आहे. त्यातच ओमिक्राॅनचा धोका आहेच. म्हणूनच आपलं आरोग्य सांभाळणं हे महत्त्वाचं काम असून ते वर्षभर करावं लागणार आहे, याची आठवण प्रसिध्द आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच करुन दिली आहे.
Image: Google
ऋजुता दिवेकर म्हणतात, की आरोग्य सांभाळायचं म्हणजे आधी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवावी लागेल . ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मेडिकलमधे औषधं नाहीत की दुकानात रेडिमेड प्रोडक्टस नाहीत. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्यालाच काम कराव्ं लागेल तेही घरात बसूनच. रोगप्रतिकारशक्ती ही आपण काय खातो, कसं खातो यावर अवलंबून असते. त्यामुळे घरचं जेवण, संपूर्ण आणि संतुलित आहार हा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीचा महत्त्वाचा आणि घरगुती उपाय आहे. ऋजुता दिवेकर म्हणतात, या घरच्या जेवणाला, संतुलित आहाराला पर्याय नाही. या एका नियमासोबतच त्या आणखी 2 महत्त्वाचे नियम सांगतात. ते म्हणजे नाटक कमी करायचं आणि फोनपासून प्रयत्नपूर्वक अंतर राखायचं. या तीन गोष्टी केल्या तरच आपली रोगप्रतिकारशक्ती वाढेल.
Image: Google
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 3 नियम
1. घरचं जेवण
हल्ली बाहेर जाऊन खाणं, बाहेरचं खाणं घरी मागवून् खाणं, रेडी टू कूक खाणं याचं प्रमाण वाढलं आहे. यामुळे पोट भरतं, समाधान मिळतं, चोचले पुरवले जातात हे खरं. पण यामुळे आरोग्यास फायदा शून्य होतो. उलट वजन वाढणं, रक्तातील साखर वाढणं, रक्तदाब- कोलेस्टेराॅल वाढणं अशा अनेक समस्या चिटकतात. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी खाण्याच्या या सवयी घातक आहे. त्या बदलल्या नसतील तर् लगेच बदलायला हव्यात असं दिवेकर सांगतात. प्रत्येक हंगामानुसार फळं, भाज्या खायला हव्यात. जेवणात पोळी, सर्व प्रकारच्या भाकरी यांचा समावेश हवा. पालेभाज्या, पातळ भाज्या, डाळ, उसळी या आवर्जून खायला हव्यात. हिवाळा हा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी उत्तम ऋतू आहे. बाजारात बोरं, आवळे, चिंचा, गाजर, मटार, सर्व प्रकारच्या पालेभाज्या मिळत आहे. मस्त गाजराचा हलवा, मक्याची भाकरी, सरसो का साग खावा आणि आरोग्य सांभाळावं. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नुसतं बेचव खाण्याची गरज् नाही. चव, आवडी सांभाळून हंगामात मिळणाऱ्या भाज्या, फळं, धान्यं यांचा वापर करुन, घरच्या जेवणावर भर देऊन रोगप्र्तिकारशक्ती वाढवता येते.
2. नाटक न करणे
खाण्यापिण्याच्या नाटकांमुळे आपण विशिष्ट पदार्थ, फळं खायचं टाळतो. पण अशा नाटकांमुळे आपण त्या त्या पदार्थातून आणि केवळ त्याच पदार्थातून मिळू शकणाऱ्या पोषण मुल्यांन आपण मुकतो. यातून् केवळ आपल्या शरीराचं, त्यातून आपल्या आरोग्याचं नुकसान होतं. हे टाळायचं असेल तर आपले घरातल्या जेष्ठ व्यक्ती जे जे पदार्थ ( जे आपल्याला आवडत नाही तेही) आरोग्यासाठी आवश्यक आहे असं सांगतात ते अवश्य खायला हवेत. मग बाजरीच्या पिठाचा घाटा असो की सातूचं पीठ असो. आवडी निवडीची नाटकं सोडा आणि जे जे पौष्टिक ते ते खायला शिका.
Image: Google
3. फोन जरा बाजूला ठेवा
जेवताना फोनची स्क्रीन स्क्रोल करत राहाणं, टी.व्ही पाहाता पाहाता जेवणं, झोप गेली उडत म्हणत रात्री उशिरापर्यंत जागत बसणं यातून आपली चयापचय क्रिया बिघडते, पचन बिघडतं, किती खातोय याकडे दुर्लक्ष होतं याचा परिणाम वजन वाढण्यावर होतो. चयापचय क्रिया बिघडली की पचनाशी संबंधित समस्या आणि त्यातून विकार निर्माण होतात. त्यामुळे कामापुरती फोनचा वापर, जेवताना फोन लांब ठेवणे, टी.व्ही बंद ठेवणे, रात्री झोपण्यापूर्वी दोन तास आधी फोन न पाहणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडिया व्हाया फोन स्क्रीनवरुन आपल्यापर्यंत पोहोचणारे अशास्त्रीय. फॅड डाएट फाॅलो न करणं.. हे नियम पाळले तर रोगप्रतिकारशक्ती नक्की वाढेल. आरोग्य सुधारेल आणि 2022 मधे मी फिटनेस कमावला असं अभिमानानं सांगता येईल. तर मग आजपासूनच ऋजुता दिवेकर यांनी सांगितलेले घर का खाना, नाटक न करना आणि फोन को दूर रखना हे नियम पाळायला सुरुवात करायची का? नव्हे करायलाच हवी!