आपल्या देशात तोंडाच्या कर्करोगाचे सर्वाधिक रूग्ण आहेत. केवळ तंबाखू खाणाऱ्यांनाच तोंडाचा कर्करोग होतो, तर तसे नाही. तोंडाचा कर्करोग कोणालाही होऊ शकतो आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे. कोरोना या वैश्विक महामारीनंतर अनेकांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाली. त्यामुळे या काळात अनेकांना विविध आजारांनी ग्रासले आहे.
गेल्या १० वर्षांत तोंडाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये एक तृतीयांशपेक्षा जास्त वाढ झाली आहे. कॅन्सरची लक्षणे जाणून घेणे आणि त्याची लवकरात लवकर तपासणी करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. ओरल हेल्थ फाउंडेशनने प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, यूकेमध्ये २०२१ मध्ये ८८६४ लोकांमध्ये हा आजार आढळून आला. हा आकडा १० वर्षांपूर्वीच्या तुलनेत ३६ टक्के अधिक होता. तर वर्षभरात या आजारामुळे ३०३४ लोकांचा मृत्यू झाला होता.
या आजारासंदर्भात ओरल हेल्थ फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी डॉ.निगेल कार्टर यांनी सांगितले की, ''धूम्रपान आणि जास्त मद्यपान केल्यामुळे ही प्रकरणे वाढत चालली आहेत. तोंडाच्या कर्करोगाने पीडित व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणामब होत आहे. या काळात खाणे आणि पिणे यासह बोलणे कठीण होऊन जाते. यासह एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक स्वरूपामध्ये देखील बदल घडू शकते.''
नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS)च्या नुसार, ''तोंडाचा कर्करोग तेव्हा होतो जेव्हा जिभेच्या पृष्ठभागावर, गाल, ओठ किंवा हिरड्याच्या आतील भागात ट्यूमर दिसतात. कधीकधी ते लहान गाठांच्या स्वरूपात दिसतात. तोंडाचा कर्करोग ओळखण्यासाठी, तुम्हाला तुमच्या तोंडात उद्भवणाऱ्या काही लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचं आहे, जसे की-
1. वेदनादायक तोंडाचे व्रण, जे कित्येक आठवड्यांनंतरही बरे होत नाहीत
2. तोंडात किंवा मानेमध्ये सतत गाठ निर्माण होणे
3. सैल दात किंवा सॉकेट जे काढल्यानंतर बरे होत नाहीत
4. ओठ किंवा जीभ सुन्न होणे
5. तोंडाच्या किंवा जिभेच्या पृष्ठभागावर पांढरे डाग किंवा लाल ठिपके दिसणे
6. बोलण्याच्या पद्धतीत बदल, जसे की लिस्पमध्ये अचानक बदल जाणवणे.
जर आपल्याला यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक. तोंडाच्या कर्करोगाची समस्या सामान्यतः धूम्रपान, मद्यपान किंवा तंबाखू खाण्यामुळे उद्भवते. मात्र, अनेक वेळा या सवयींपासून दूर राहणाऱ्यांमध्येही हा आजार दिसून येतो. तोंडाच्या कर्करोगाचा उपचार ३ प्रकारे केला जातो, पहिला- शस्त्रक्रियेद्वारे कर्करोगाच्या पेशी काढून टाकणे, दुसरा- रेडिओथेरपी आणि तिसरा- केमोथेरपी. त्यामुळे तोंडाच्या बाबतीत कोणत्याही सामस्येला दुर्लक्षित करू नये.