रक्तदाब ही सध्या एक मोठी समस्या झाली आहे. कधी कमी रक्तदाबामुळे तर कधी जास्त रक्तदाबामुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्भवत असल्याचे दिसते. एकदा रक्तदाबाची समस्या मागे लागली की लागली. मी नियमितपणे औषधे घेण्यावाचून पर्याय राहत नाही. पूर्वी वयाच्या चाळीशीनंतर होणारा रक्तदाब आता वयाच्या तिशीतच व्हायला लागला आहे. हा रक्तदाब सतत वाढत असेल तर त्याचा हृदयावर, मेंदूवर, किडनीवर परिणाम होतो. त्यामुळे एकूण आरोग्याच्या तक्रारी वाढतात. पण रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी काही घरगुती उपायही तितकेच फायदेशीर ठरतात. आयुर्वेदात आपल्या स्वयंपाकघरातील अनेक वनस्पती किंवा मसाल्याचे पदार्थ अतिशय उपयुक्त असल्याचे सांगितले आहे. रक्तदाबामुळे आरोग्याच्या इतर समस्य़ा उद्भवू नयेत म्हणून घरच्या घरी कोणते उपाय करता येतात ते पाहूया...
१. तुळस
तुळस ही आरोग्याच्या अनेक तक्रारींवरील एक रामबाण उपाय असल्याचे आपल्याला माहित आहे. साधारणपणे आपल्या प्रत्येकाच्या घरात तुळशीचे रोप असतेच. रक्तदाब, सर्दी, खोकला, हाडांचा ठिसूळपमा अशा विविध तक्रारींवर तुळस अतिशय फायदेशीर असल्याचे आपल्याला माहित आहे. तुळशीमध्ये असणाऱ्या इजेनॉलमुळे रक्तवाहिन्यांवरील ताण कमी व्हायला मदत होते आणि रक्तदाब कमी होतो. त्यामुळे तुळशीची पाने चावून खाणे किंवा चहामध्ये तुळस घालणे अतिशय फायदेशीर ठरते.
२. आवळा
आवळ्यातील औषधी गुणधर्म आपल्याला माहित आहेत. सी व्हिटॅमिन असल्याने प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवळा खाणे फायदेशीर ठरते. रक्तवाहिन्यांचा आकार मोठा करण्याचे काम आवळ्यामुळे होते आणि त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या दूर होण्यास मदत होते. ज्यांना हृदयासी निगडीत समस्या आहेत अशांनी उपाशी पोटी कच्चा आवळा खाण्याचा सल्ला तजज्ञ देतात. आवळा सरबत, आवळ्याचा रस, आवळा कॅंडी, मोरावळा असे आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ आपण आहारात घेऊ शकतो.
३. लसूण
आपण रोजच्या आहारात वेगवेगळ्या पदार्थांना फोडणी देण्यासाठी किंवा वाटणामध्ये आवळ्याचा आवर्जून वापर करतो. लसणामध्ये सल्फरचे प्रमाण चांगले असल्याने हृदयरोगावर लसूण खाणे उपयुक्त ठरते. लसणाने पदार्थांना वेगळा स्वाद येत असल्याने आणि रक्तदाब कमी करण्यासाठीही लसूण उपयुक्त असल्याने आहारात लसणाचा आवर्जून वापर करायला हवा.
४. दालचिनी
भारतील मसाल्यांमधील एक महत्त्वाचा मसाल्याचा पदार्थ म्हणून दालचिनी ओळखली जाते. रक्तवाहिन्या रिलॅक्स होण्यासाठी दालचिनीचा अतिशय चांगला उपयोग होतो. यामुळे वाढलेला रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
५. अश्वगंधा
ही आयुर्वेदातील एक महत्त्वाची वनस्पती. प्रतिकारशक्ती वाढण्याबरोबरच भिती आणि ताणापासून सुटका होण्यासाठी अश्वगंधेचा उपयोग केला जातो. ग्लासभर पाण्यात अश्वगंधा पावडर एकत्र करुन प्यायल्यास रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.