भाजी-पोळी हे महाराष्ट्रातील मुख्य अन्न आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच डब्यालाही न्यायला सोपे असल्याने आणि पौष्टीक असल्याने साधारणपणे भाजीपोळीच नेतो. रोज वेगळी काय भाजी करायची असा प्रश्न तमाम महिलांसमोर असतो. सतत आवडीच्या म्हणजे बटाटा, भेंडी, फ्लॉवर यांसारख्या भाज्या करणे शक्य नसते. त्यातून म्हणावे तसे पोषक घटकही मिळत नाहीत. त्यामुळे कधी ना कधी आपल्याला न आवडणाऱ्या दुधी भोपळा, दोडका, घोसाळं, कारलं यांसारख्या भाज्यांचाही नंबर येतोच. अनेकदा आपल्याला या भाज्या मुकाट्याने खाव्या लागतात नाहीतर आई किंवा बायको ओरडते (Incredible Health Benefits of Ridge gourd tori Dodka).
मग कधी दोडक्याच्या भाजीसोबत चटणी, सॅलेड, फरसाण असं काहीबाही घेऊन आपण जबरदस्ती या भाज्या कशाबशा खातो. पण बरेचदा या भाज्या समोर आल्या की नाक मुरडलं जातं. शिजल्यावर काहीशा गिचगिचित होत असल्याने अनेकांना या भाज्या खायला नकोशा होतात. पण प्रत्येक भाजीतून शरीराला काही ना काही पोषक घटक मिळतात त्याचप्रमाणे दोडक्याची भाजी खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे होतात. पाहूयात दोडक्याचे शरीराला होणारे अतिशय उपयुक्त फायदे कोणते...
१. डोळे चांगले राहण्यास फायदेशीर
दोडक्यामध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असल्याने तो आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. दृष्टी चांगली राहण्यासाठी व्हिटॅमिन ए उपयुक्त असल्याने डोळ्याच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी आहारात आवर्जून दोडक्याचा समावेश करायला हवा.
२. बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणा दूर करण्यास मदत
दोडक्यामध्ये काकडीप्रमाणे पाण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच या भाजीत फायबरही चांगल्या प्रमाणात असते. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते आणि वेळच्या वेळी पोट साफ झाल्यास आरोग्य चांगले राहण्यासही मदत होते. तसेच फायबरचे प्रमाण चांगले असल्याने वजन कमी करण्यासाठी दोडका उपयुक्त ठरतो.
३. डायबिटीससाठी उपयुक्त
दोडक्याच्या भाजीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू नये यासाठी हा ग्लायसेमिक इंडेक्स अतिशय महत्त्वाचा असतो. काही जणांची शुगर अचानक खूप वाढते, या समस्येवर दोडका फायदेशीर ठरतो.
४. रक्ताची कमतरता भरुन काढण्यास फायदेशीर
ज्या लोकांच्या शरीरात काही ना काही कारणाने रक्ताची कमतरता असते त्यांनी आहारात आवर्जून दोडका घ्यायला हवा. दोडक्यामध्ये लोह आणि व्हिटॅमिन बी ६ असते. यामुळे लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन आणि लोहाची मात्रा वाढते आणि रक्ताची कमतरता भरुन निघण्यास मदत होते.