अमूक एक गोष्ट खूप वाईट आहे. सध्या जाणवत नसला तरी काही काळाने तिचा आपल्या तब्येतीवर विपरित परिणाम (Habits that causes health issues) होऊ शकतो. त्यामुळे ही अमूक एक सवय आपण सोडायलाच पाहिजे हे आपल्याला कळत असतं. पण वळत नसतं.. अशी एखादी तरी सवय प्रत्येकाला असतेच असते. काही सवयी तर कॉमन असतात. म्हणजे खूप लोकांमध्ये त्या पाहायला मिळतात. म्हणूनच तर स्वातंत्र्यदिनी आपण सगळेच आरोग्यदायी जगण्याचा संकल्प करू या आणि या काही वाईट सवयींपासून मुक्ती मिळवूया.. (Try to get freedom from these 5 bad habits)
आरोग्यासाठी हानिकारक ठरणाऱ्या या वाईट सवयींपासून मुक्ती मिळवूया...
१. पुरेशी झोप न घेणे
रात्रीची जागरणं ही अनेकांची लाईफस्टाईल झाली आहे. रात्री अंथरुणावर पडल्यापडल्या स्क्रिन बघत राहणे ही अनेकांची सवय. त्यामुळे मग लवकर झोप येत नाही. अर्धी रात्र उलटून गेल्यावर झोप लागते. हे रोजचंच झाल्याने मग रोजच अपुरी झोप होते. आराेग्याच्या दृष्टीने ही सवय अजिबात चांगली नाही. यामुळे हार्मोन्सचे असंतुलन होते आणि त्यामुळे मग वेगवेगळे आजार मागे लागतात. त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर ही सवय सोडण्याचा प्रयत्न करा.
२. योग्य प्रमाणात पाणी न पिणे
शरीरातील सर्व क्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. पण वेळ नसतो म्हणून किंवा मग लक्षातच राहात नाही म्हणून अनेक जण पाणी कमी पितात. दिवसातून ८ ग्लास पाणी तरी प्यायलाच हवे. नाहीतर मग डिहायड्रेशन, अपचन आणि इतर अनेक त्रास मागे लागू शकतात.
३. जंकफूड खाणे
कधीतरी बदल म्हणून पंधरा दिवसांतून किंवा महिन्यातून एकदा जंकफूड खायला हरकत नाही. पण हल्ली जंकफूड खाणं हे बऱ्याच जणांचं रुटीन झालं आहे. एकतर रस्त्यावर मिळणारं स्ट्रीटफूड, जंकफूड कमी किमतीत मिळतं शिवाय ते अधिक टेस्टीही असतं. त्यामुळे मग नेहमीच असे पदार्थ खाल्ले जातात. पण त्यामुळे मग पचन, चयापचय क्रिया बिघडतात. ब्लड प्रेशर, ब्लड- शुगर लेव्हल वाढते. शिवाय स्थुलता, मूड स्विंग असे त्रासही त्यामुळे होतात.
४. चहा- कॉफीचे अतिसेवन
झोप घालविण्यासाठी, फ्रेश होण्यासाठी, वेळ घालविण्यासाठी किंवा मग आवड म्हणून अशा वेगवेगळ्या कारणांसाठी चहा- कॉफी खूप जास्त प्रमाणात घेण्याची सवय अनेकांना असते. पण हे दोन्ही पदार्थ गरजेपेक्षा अधिक प्रमाणात घेतल्यामुळे निद्रानाश, छातीत जळजळ, डोकेदुखी, एन्झायटी, रक्तदाब वाढणे, मांसपेशींना थकवा येणे, पचनक्रियेत अडथळे असे वेगवेगळे त्रास जाणवतात.
५. व्यायाम न करणे
आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातच वेगवेगळे आजार मागे लागत आहेत. आपल्यासोबत असं होऊ द्यायचं नसेल तर फिटनेस जपणं गरजेचं आहे. आणि फिटनेससाठी व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे कंटाळा सोडा, रोजच्या तुमच्या बिझी शेड्यूलमधून थोडा वेळ काढा आणि तब्येत जपण्यासाठी रोज थोडा- थोडा का होईना, पण व्यायाम कराच..