सर्दी- खाेकला असे काही त्रास झाले की त्यासाठी डॉक्टरांकडे जाणे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार गोळ्या- औषधी घेणे, याचे प्रमाण आपल्याकडे खूपच कमी आहे. सर्दी- खोकला अशा त्रासांसाठी किंवा बऱ्याचदा ताप आल्यानंतरही आपल्याकडे बहुतांश लोक मनानेच औषध- गोळ्या घेतात. लहान मुलांच्या बाबतीतही बऱ्याचदा हाच प्रयोग केला जातो. पण तोच प्रकार लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असून त्यामुळेच भारताच्या सेंट्रल ड्रग स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने लहान मुलांसाठी असणाऱ्या सिरप कॉम्बिनेशनवर किंवा ॲण्टी कोल्ड कॉकटेल औषधांवर बंदी घातली आहे.
याबाबत सेंट्रल ड्रग स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने काढलेल्या नियमावलीनुसार ग्लैक्सोस्मिथक्लाईन या कंपनीचा टी- मिनिक ओरल ड्रॉप, ग्लेनमार्कचा एस्कोरिल फ्लू सिरप आणि आयपीसीए लॅबोरेटरीजचे सोल्विन कोल्ड सिरप यांच्यासह इतर काही कंपन्यांनाही याबाबत चेतावनी दिली आहे. ही सगळी औषध सर्दी, खोकला, फ्लू या आजारांमध्ये देण्यात येतात. पत्रात असेही म्हटले गेले आहे की याविषयीच्या एका अभ्यासक समितीने क्लोरफेनिरामाइन मैलेट आयपी २ एमजी, फिनाइलफ्राइन एचसीआय आयपी ५ एमजी या औषधांना तर्कसंगत जाहीर केले होते. मात्र आता या औषधांमुळे लहान मुलांच्या तब्येतीवर विपरित परिणाम झाल्याची अनेक उदाहरणे समोर आल्याने त्याबाबत ठोस निर्णय घेण्यात आला असून ही औषधं ४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना देऊ नयेत, असे सांगण्यात आले आहे. तसेच या कंपन्यांनी त्यांच्या औषधांच्या पाकिटांवरही याबाबतची ठळक माहिती द्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.