Join us   

पोट सारखं फुगल्यासारखं वाटतं? तज्ज्ञ सांगतात, घरच्या घरी करता येईल असा सोपा उपाय, मिळेल आराम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2023 11:23 AM

Instant Home Remedy For Bloating : आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार सांगतात, घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून करता येणारा उपाय

पोटाच्या समस्या असतील तर आपल्याला दिवसभर अस्वस्थ होत राहतं. कधी पोट साफ न होणे, पोटात गॅसेस अडकल्यासारखे होणे, पोट फुगणे, अॅसिडीटी अशा समस्या निर्माण होतात. पोटाचे आरोग्य बिघडलेले असेल तर अनेकदा आपल्याला नीट झोपही येत नाही. आता हे पोटाचं गणित बिघडलं की आपल्याला काहीच सुचत नाही. अशावेळी लगेच औषधे घेण्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केले तर त्याचा निश्चितच फायदा होतो. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यासाठीच घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून करता येईल असा एक अतिशय सोपा उपाय सांगतात. झटपट होणारा हा उपाय केल्यास पोटाला निश्चितच आराम मिळण्यास मदत होते. हा उपाय कोणता आणि त्याचा काय फायदा होतो याविषयी (Instant Home Remedy For Bloating)...

उपाय काय?

अर्धा चमचा ओवा, चिमूटभर सैंधव मीठ आणि चिमूटभर हिंग एका बाऊलमध्ये एकत्र करायचे. हे मिश्रण कोमट पाण्यासोबत घ्यायचे. एक आठवडा किंवा १५ दिवसांसाठी नियमितपणे हा उपाय केल्यास पचनाचे त्रास किंवा पोट फुगण्याची समस्या कमी होण्यास याचा चांगला उपयोग होतो. जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा अर्धा तास नंतर हा उपाय केल्यास फायदेशीर ठरतो. 

(Image : Google)

फायदे

१. ओवा 

ओवा हा प्रकृतीने उष्ण, पचायला हलका असतो. पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी ओवा अतिशय चांगला असतो. वात आणि कफ संतुलित राहण्यासाठी ओवा फायदेशीर ठरतो. काही कारणाने तोंडाची चव गेली असल्यास ओव्यामुळे ही चव पुन्हा येण्यास मदत होते. 

२. हिंग 

पोटाच्या समस्यांसाठी पूर्वीपासून हिंगाचा वापर केला जातो. हिंग प्रकृतीने तिक्ष्ण आणि उष्ण असते. तसेच पचायला हलके असल्याने पचनाशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. कृमी कमी करण्यासाठी तसेच डोळ्याचे आणि हृदयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठीही हिंग फायदेशीर असते. 

३. सैंधव 

सैंधव मीठ हे औषधी मानले जाते. साध्या मीठापेक्षा आहारात नियमितपणे त्याचा वापर करावा. प्रकृतीने शीत असणारे हे मीठ वात, कफ आणि पित्त अशा तिन्ही प्रकृतीसाठी उपयुक्त असते. त्यामुळे पोटाशी निगडीत किंवा इतरही कोणता त्रास झाला तर घरात सैंधव जरुर असायला हवे. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल