Join us   

भर उन्हाळ्यात पावसाळी हवेने घसा खवखवतो, दुखतो आहे, गिळायला त्रास होतो? १ सोपा उपाय, घसा होईल मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2023 1:58 PM

Instant Relief from Sore Throat Home Remedy : हवेतील बदलांमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत असताना घरच्या घरी सोपा उपाय केल्यास नक्कीच आराम मिळू शकतो.

उन्हाळा म्हटलं की डोक्यावर कडक ऊन आणि त्यामुळे होणारे उष्णतेचे विकार. हे खरं असलं तरी यंदा ऐन मार्चमध्ये राज्यात अवकाळी पाऊस झाल्याने हवामान विचित्र झाले आहे. ऐन उन्हाळ्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आरोग्याच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातच इन्फ्लुएन्झा या नव्या व्हायरसने अनेकांना सर्दी-ताप, खोकला, घसा खवखवणे अशा समस्या निर्माण होत आहेत. कधी ढगाळ हवामान, सकाळी आणि रात्री गार हवा आणि दिवसभर कडक ऊन यांसारख्या हवेतील बदलांमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत (Instant Relief from Sore Throat Home Remedy). 

गेल्या काही दिवसांत प्रत्येक घरात व्हायरल इन्फेक्शनमुळे आजारी असलेला एक तरी रुग्ण दर काही दिवसांनी दिसतो. घसादुखी हे व्हायरल इन्फेक्शनचे सर्वात पहिले आणि मुख्य लक्षण असते.  अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच घसादुखी त्यानंतर सर्दी, खोकला, ताप अशाप्रकारचे त्रास होत आहेत. यासाठी लगेच औषध घेण्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास त्याचा नक्कीच चांगला उपयोग होऊ शकतो. डायटिशियन रोहीणी सोमनाथ पाटील घशाची तक्रार दूर करण्यासाठी एक सोपा उपाय सांगतात. हा उपाय कसा करायचा पाहूया...

(Image : Google)

१. आलं स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करायचे आणि मिक्सरवर त्याचा रस करायचा. एका वाटीत हा आल्याचा रस काढून घ्यायचा.

२. यामध्ये चिमूटभर मिरपूड, हळद आणि चांगल्या दर्जाचा १ चमचा मध घालून हे मिश्रण एकत्र करायचे.

३. दिवसातून एकदा किंवा २ वेळा १ चमचाभर हे मिश्रण घ्यायचे. त्यानंतर अगदी काही वेळात घसादुखीची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी झालेली दिसेल.

४. आलं, हळद, मध आणि काळी मिरी हे चारही घटक घरात सहज उपलब्ध असतात. तसेच अँटीबॅक्टेरीयल गुणधर्म असल्याने हे इन्फेक्शन वाढण्याची शक्यता नसते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडी