Join us   

रिफाईंड ऑईल आरोग्याला बरे नाही म्हणून घाण्याचे तेल वापरता? तज्ज्ञ सांगतात, घाण्याचे तेल चांगले असते की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2024 3:24 PM

Is Cold Pressed Oil really good for health :रिफाइंड तेलाच्या दुप्पट किंवा तिप्पट दरात हे घाण्याचे तेल विकले जाते.

रोजच्या स्वयंपाकात कोणते तेल वापरावे याविषयी कायमच वेगवेगळी मतं ऐकायला मिळतात. सध्याचे धकाधकीचे जीवन, आहाराचा दर्जा, आहार पद्धती यामुळे आजारांचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढताना दिसत आहे. म्हणूनच आता आपण कोणत्या प्रकारचे अन्नपदार्थ खातो याबाबत सगळेच जागरुक झालेले दिसतात. त्यातही प्रत्येक गोष्टीसाठी बाजारात विविध ब्रँड मोठ्या प्रमाणात जाहिरात करत असल्याने नेमके काय चांगले याविषयी आपल्या मनात संभ्रमावस्था निर्माण होते. तेलाच्या बाबतीत तर रिफाईंड ऑईलपेक्षा घाण्याचे किंवा लाकडी घाण्याचे तेल जास्त चांगले असल्याचे म्हटले जाते (Is Cold Pressed Oil really good for health). 

त्यामुळे प्रत्यक्षात बाजारात मिळणार्‍या रिफाइंड तेलाच्या दुप्पट किंवा तिप्पट दरात हे घाण्याचे तेल विकले जाते. असे असूनही ग्राहक हे तेल खरेदी करतात. पण हे तेल खरंच घाण्यातून काढले जाते का, घाण्यातून काढलेल्या तेलाचे पोषणमूल्य खरंच जास्त असते का, याविषयी तज्ज्ञ नेमके काय सांगतात समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अमिता गद्रे याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती देतात. त्यांच्या म्हणण्यांनुसार लाकडी घाण्याचे तेल वापरल्यानेही हृदय विकाराचा धोका संभवतोच. यामागची नेमकी कारणे कोणती समजून घेऊया.. 

(Image : Google)
  १. लाकडी घाण्याचे किंवा रिफाइंड तेल कोणतेही तेल असले तरी ते शरीरात गेल्यावर स्निग्ध पदार्थाचेच काम करणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचे तेल खात असाल, ते कितीही शुद्ध असल्याचा दावा केला जात असला तरी एका प्रमाणापेक्षा अधिक खाणे आरोग्यास घातकच आहे. 

२. सतत तेलकट पदार्थ खाण्यामुळे तुम्ही कोणतेही तेल वापरले तरी त्यामुळे धमण्यामध्ये फॅट्स, मेद, कोलेस्ट्रॉल जमा होऊन त्या धमण्या ब्लॉक होऊ शकतात. तेल शरीरात गेल्यावर ते कोणत्या प्रकारचे आहे यानुसार कार्य करत नाही. त्यामुळे त्याचा वापर नियंत्रित ठेवणे हे आपलेच काम आहे.

(Image : Google)
  ३. त्यामुळे रिफाईंड तेल नको म्हणून तुम्ही लाकडी घाण्याचे तेल प्रमाणाबाहेर खात असाल तर त्यामुळेही हृदय विकाराचा धोका संभवतो. त्यामुळे तेल कोणते खातो यापेक्षा तेल किती खातो याचा अधिक विचार करायला हवा. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना