दही म्हणजे प्रोटीनचा महत्त्वाचा स्त्रोत, त्यामुळे आहारात दह्याचा आवर्जून समावेश करावा असं आहारतज्ज्ञ सांगतात. लहान मुलांना तर दही इतकं आवडतं की ते अनेकदा हाताने चाटून दही खात बसतात. आपणही पराठा, थालिपीठ, भात यांच्यावर मुलांना आवर्जून दही देतो. दह्याचे दही वडा, दही बुंदी, दही चाट, कोशिंबीर हे पदार्थही आवडीने खाल्ले जातात. उन्हाळ्याच्या दिवसांत तर जेवणात गारेगार दही नाहीतर ताक आवर्जून घेतले जाते. पण थंडीच्या दिवसांत गार दही खायला नको वाटते (Is it fine to have curd in colds and winter season).
दही गार असल्याने थंडीच्या दिवसांत दही द्यावे की नाही असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. दह्याने थंडीत सर्दी होईल, घसा दुखेल किंवा आधीपासून सर्दी- कफ किंवा खोकला असेल तर ती वाढेल. असे काही समज पालक म्हणून आपल्या मनात असल्याने आपण स्वत: तर दही खात नाहीच पण आपण मुलांनाही थंडीत दही देणे टाळतो. पण यामागे काहीही ठोस कारण किंवा तथ्य नाही. त्यामुळे थंडीत दही न खाणे हा गैरसमज आहे. थंडीत मुलांना दही द्यावे की नाही याबाबत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. पार्थ सोनी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून ते थंडीत दही देण्याबाबत नेमकं काय सांगतात पाहूया...
थंडीत दही द्यावे की नाही?
मुलांना सर्दी किंवा खोकला झाला की दही खाऊ नये असा एक चुकीचा समज आपल्याकडे दिसतो. पण दह्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व, खनिजे, बॅक्टेरीयाशी लढणारे काही गुणधर्म असतात. त्यामुळे थंडीत दही बंद करण्याची अजिबात आवश्यकता नाही. आरोग्यासाठी फायदेशीर दही थंडीत किंवा सर्दी असतानाही खाऊ शकतो. फक्त हे दही गार असता कामा नये. त्यामुळे खाण्याच्या आधी काहीवेळ फ्रिजमधून बाहेर काढून ठेवलेले आणि सामान्य तापमानाला असलेले दही खायला हवे.