चहा हे आपल्याकडे अमृताप्रमाणे प्यायले जाणारे पेय आहे. झोपेतून उठल्यावर सकाळी सकाळी आपल्यापैकी अनेकांच्या हातात चहाचा कप असतोच असतो. इतकंच नाही तर नाश्ता केल्यानंतर घराबाहेर पडताना बरेच जण चहा घेतात. आता अशाप्रकारे नाश्त्याच्या सोबत किंवा नाश्ता झाल्यावर चहा घेणं आरोग्यासाठी कितपत योग्य असतं याबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसते. पण खाल्ल्यानंतर काहीतरी गोड घेतलं की बरं वाटतं म्हणून आपण चहा किंवा कॉफी घेतो. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ श्वेता शाह पांचाळ याविषयी महत्त्वाची माहिती आपल्याशी शेअर करतात. त्या नेमके काय सांगतात पाहूया (Is it Fine To have Tea With or after Breakfast)...
१. आपण ब्रेकफास्ट घेतो त्यातून आपल्याला व्हिटॅमिन्स आणि खनिजे मिळत असतात. हे घटक आपल्या शरीरात शोषले जाणे आवश्यक असते. शरीरातील एनर्जी टिकून राहावी यासाठी हे घटक शरीरात योग्य पद्धतीने शोषले जाणे आवश्यक असते.
२. पण आपण ब्रेकफास्टनंतर किंवा ब्रेकफास्टमध्ये जेव्हा चहा घेतो तेव्हा त्यातील पोषक घटक मारले जातात आणि शरीराचे पोषण होत नाही.
३. चहामध्ये असणारे घटक व्हिटॅमिन्स, खनिजे आणि मायक्रोन्यूट्रीयंटस शोषून घेण्याची शरीराची क्षमता कमी करण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे खाल्लेल्या पदार्थांतील आणि सप्लिमेंटसमधील पोषक घटक शरीराला मिळत नाहीत.
४. उदाहरणार्थ तुम्ही नाश्त्यामध्ये मोड आलेली कडधान्ये घेतली तर ही कडधान्ये प्रोटीन आणि लोह याचा उत्तम स्त्रोत असतात. पण चहामध्ये असणारे फायटेटस आणि पोलिकेनॉल्स यांमुळे प्रोटीन आणि आयर्न यांची पोषकता शरीरास मिळण्यास अडथळे निर्माण करतात.
५. एकदा आपल्याला नाश्त्याच्या वेळी चहाची सवय लागली की ती सवय लगेच जात नाही. तसेच सुरुवातीला याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र जसे वय वाढत जाते आणि आपण चाळीशी किंवा पन्नाशीत जातो तसे शरीरातील व्हिटॅमिन्स किंवा आवश्यक घटक यांची कमतरता निर्माण झाल्याचे दिसते.