दररोज दिवसभराच्या कामांनी आपण इतके दमतो की कधी एकदा रात्री गादीवर पडतो आणि आपल्याला झोप लागते असे आपल्याला होऊन जाते. सकाळी झोपेतून उठल्यापासून स्वयंपाक, साफसफाई, स्वत:चे आवरणे, मुलांचे आवरणे, ऑफीस, येणार-जाणार, त्यात सणवार असे करता करता आपली पार तारांबळ उडते. शरीर, मन, मेंदू इतका थकून जातो की अनेकदा फक्त आरामच करावा असं वाटतं. पण वीकेंडलाही जास्तीच्या कामांनी डोकं वर काढलेलं असल्याने आपल्याला आराम मिळत नाही. अनेकदा रात्री आपण खूप थकलेले असतो पण गादीवर पडल्यावर डोळे मिटले तरी आपल्याला बराच वेळ झोप येत नाही (Is it Normal To Wake Up in the Middle of the Night).
कधी प्रमाणापेक्षा जास्त थकल्यामुळे तर कधी डोक्यात विचारांचे काहूर माजलेले असल्याने तर कधी आणखी कोणत्या गोष्टीने झोप लागत नाही. मात्र एकदा झोप लागली की इतकी गाढ लागते की थेट सकाळीच जाग येते. पण काही वेळा आपल्याला रात्री गादीवर पडल्यावर गाढ झोप लागते आणि मध्यरात्री अचानकच जाग येते. अशी रात्री अचानक जाग आल्यावर पुन्हा लगेच झोपही लागते. तर काही वेळा एकदा जाग आली की काही केल्या झोप लागत नाही. तुमच्यासोबतही असे नेहमी होत असेल तर ते नॉर्मल आहे की काही प्रॉब्लेम आहे असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडला असेल. तर असे होणे अतिशय सामान्य आहे असे प्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ आणि निद्रातज्ज्ञ डॉ. ब्रँडन पिटर्स यांनी सांगितले.
डॉ. पिटर्स म्हणतात, आपल्या प्रत्येकाच्या झोपेची एक सायकल असते. रात्री आपल्याला झोपेत जाग येणे अतिशय नैसर्गिक आहे. साधारणपणे आपली एक सायकल ९० ते १२० मिनीटांची असते. ही सायकल पूर्ण झाली की आपल्याला अर्धवट जाग येते. रात्री आपण साधारणपणे ७ ते ८ तास झोपतो. यामध्ये व्यक्तीनुसार ३ ते ५ स्लीप सायकल्सचा समावेश असतो. म्हणजेच साधारणपणे एका रात्रीत आपल्याला २ ते ४ वेळा जाग येते. ही जाग ५ मिनीटांपेक्षा कमी असेल तर आपल्याला झोपेत अशाप्रकारे जाग आलेली हेही आपल्या लक्षात राहत नाही. पण ५ मिनीटांहून जास्त वेळ जाग असेल तर मात्र आपली झोपमोड झाली असे आपण म्हणतो. मात्र तुम्हाला रात्री नेहमी किंवा जास्त वेळा जाग येत असेल तर ते अतिशय सामान्य आहे आणि त्याबद्दल जास्त काळजी करण्याचे कारण नाही हे लक्षात घ्यायला हवे.