Join us   

डायबिटीस असेल तर गव्हाची पोळी खाणं खरंच धोक्याचं असतं का? गहू नको तर मग ज्वारी खावी की बाजरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2022 4:59 PM

Tips for Diabetes Patients डायबिटीस म्हंटलं की खाण्यापिण्यावर येणारी बंधन पाहता नेमका आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन मग धान्य कोणते ते निवडावे.

डायबिटिक रुग्णांना आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर नजर ठेवावी लागते. त्यांना भात आणि चपातीचे सेवन कमी करावे असा सल्ला दिला जातो. खरंतर हा एक क्रोनिक आजार आहे ज्यात आपल्या रक्तातील साखरेची पातळी एकाएकी वाढू लागते. अशा परिस्थितीत धोका जास्त वाढतो. त्यामुळे गोड पदार्थ किंवा चपाती आणि भात त्यांना टाळायला सांगितले जाते. मात्र, आपल्याला चपात्या खायच्या असतील तर त्याचे प्रमाण किती असावे, त्यासाठी कोणते पीठ वापरावे? या प्रश्नांकडे लक्ष देणेही महत्त्वाचे आहे. 

जनरल फिजिशियन डॉ. पाखी शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, "चपाती पौष्टिक आहे कारण त्यात प्रथिने, फायबर, आयरन, पोटॅशियम, सोडियम, सेलेनियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखी खनिजे असतात. एका चपातीमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट असतात. जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात."

गव्हाच्या पिठात कार्ब्स अधिक असतात व ग्लायसेमिक इंडेक्ससुद्धा अधिक असते. ज्यामुळे ब्लड शुगर बूस्ट होऊ शकते. अशावेळी गव्हाच्या ऐवजी वेगळ्या धान्याचेही पर्याय उत्तम.

बेसनाच्या पोळ्या

चण्याचे पीठ ग्लूटेन फ्री असते. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात येण्यास मदत होते. त्यामुळे आपण बेसनाचे पोळी खाऊ शकता अगदीच चवीत फरक वाटत असल्यास सुरुवातीला गव्हाच्या पिठात बेसन टाकून पोळ्या करायला सुरुवात करू शकता.

ज्वारीची भाकरी

ज्वारीच्या भाकरी कमी ग्लूटेन असते. जे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत करते. ज्वारीत पाचक फायबर, मँग्नेशियम, प्रोटीन उपलब्ध असते. जे शरीराला ऊर्जा देते. अशा परिस्थितीत डायबिटीजच्या रुग्णांना ज्वारीची भाकरी अत्यंत लाभदायक ठरू शकते. 

नाचणीची भाकरी

नाचणीच्या भाकरीमध्ये बऱ्याच प्रमाणावर फायबर आढळून येते. नाचणीची भाकरी खाल्ल्यास आपल्याला पोट पटकन भरल्यासारखे वाटू शकते. यामुळे वजन सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होते. डायबिटिक रुग्णांसाठी खाण्यासाठी नाचणीची भाकरी उत्तम पर्याय आहे.

टॅग्स : मधुमेहहेल्थ टिप्सआरोग्य