Join us   

कान साफ करण्यासाठी कॉटन बड्स वापरता? तज्ज्ञ सांगतात, बड्स सुरक्षित असतात की धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2023 1:38 PM

Is It Safe To Use Ear Cotton Buds To Clean Ear Wax : कॉटन बड्स वापरण्याचे तोटे वेळीच लक्षात घ्यायला हवेत...

कान साफ करणे हे स्वच्छतेच्या बाबतीतले एक महत्त्वाचे काम असते. विकेंडला आपण ज्याप्रमाणे केस धुतो, नखं कापतो त्याचप्रमाणे कानही साफ करतो. कान साफ करण्यासाठी आपल्याकडे कानकोरणे, हेअर क्लीप यांबरोबरच कॉटन बड्सचा वापर केला जातो. त्याला पुढे कापसाचा बोळा असल्याने कानातला ओला मळ चिकटून तो निघून येण्यास मदत होते. इतकेच नाही तर कान हा अतिशय नाजूक अवयव असल्याने त्याच्या आतील पडद्याला इजा होऊ नये यासाठी कापूस असलेले हे कॉटन बड्स वापरणे फायद्याचे ठरते. कधी कानात खाज आल्यावर किंवा काही वळवळल्यासारखे वाटल्यावरही आपण अगदी सहज कानात कॉटन बड्स घालतो. मात्र इयर बड्सने कान साफ करणे आरोग्यासाठी उपयुक्त असते की नाही याबाबत आपल्याला माहित नसते. याविषयी त्वचारोगतज्ज्ञ डॉ. किरण एमडी सांगतात (Is It Safe To Use Ear Cotton Buds To Clean Ear Wax)..

१. कॉटन बड्समुळे कानातील मळ साफ होतो पण यामुळे आपल्या कानाला कट लागण्याची शक्यता असते. तसेच कानाच्या पडद्यासाठीही हे बड्स उपयुक्त नसतात. त्यामुळे कान साफ करण्यासाठी हे बड्स वापरु नयेत. 

(Image : Google)

२. यापेक्षा कानातील मळ सहज निघावा यासाठी आपण बेबी ऑईलचा वापर करु शकतो. यामुळे जमा झालेला मळ सहज वर येण्यास मदत होते आणि तो काढणे सोपे जाते. अगदी २ ते ३ थेंब तेल घातल्यास मळ काढणे सोपे होते.

३. आंघोळ करताना आपण इतर अवयव ज्याप्रमाणे साफ करतो त्याचप्रमाणे आंघोळीच्या वेळी कानातला मळ साफ करणे जास्त चांगले. रोजच्या रोज आंघोळीच्या वेळी कान साफ केला तर एकदम इतका मळ साठत नाही आणि मग कान साफ राहण्यास मदत होते. 

४. याशिवाय जर कानातला मळ कोरडा झाला असेल तर तो काढणे अवघड होते. मेडीकलमध्ये सोलीव्हॅक्स किंवा त्यासारखी काही औषधे मिळतात. ती घातल्याने मळ ओलसर होऊन बाहेर येण्यास मदत होते. यानेही फरक पडला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेणे किंवा डॉक्टरांकडे जाऊन मळ काढून घेणे सोयीचे ठरते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल