ब्रेसियर हा महिलांच्या कपड्यांमधील एक महत्त्वाचा घटक असतो. स्तनांना योग्य तो सपोर्ट मिळण्यासाठी, कोणत्याही प्रकारचे कपडे घातल्यावर कम्फर्टेबल वाटण्यासाठी वयात आल्यावर मुला साधारपणपणे ब्रेसियर वापरण्यास सुरुवात करतात. सध्या ब्रेसियरमध्ये बरेच प्रकार बाजारात मिळत असून प्रत्येक जण आपल्या कम्फर्टेनुसार ब्रेसियरची निवड करते. पण आपण वापरत असलेली ब्रेसियर ही आपल्या योग्य मापाची असेल तर ती दिसायलाही चांगली दिसते आणि शरीराला त्याचा त्रासही होत नाही. दिवसभर आपण नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर असतो त्यामुळे एकदा आंघोळ झाल्यावर घातलेले कपडे साधारणपणे रात्रीपर्यंत आपल्या अंगावर तसेच असतात (Is It Safe to Ware Bra While Sleeping at Night).
मात्र रात्री घरी आल्यावर कधी एकदा कपडे बदलून आपण घरातले कपडे घालतो असे अनेकदा आपल्याला होऊन जाते. यावेळी आपल्याला बरेचदा गरम होत असल्याने किंवा घट्ट होत असल्याने ब्रेसियरही काढून टाकण्याची इच्छा होते. पण घरात पुरुष मंडळी असल्याने किंवा अन्य काही कारणांनी आपण ती काढत नाही. मात्र रात्री झोपताना बऱ्याच महिला ब्रेसियर काढून झोपतात. तसे करणे आरोग्यासाठी चांगले असते का, त्यामुळे स्तनांचा आकार बिघडतो का किंवा ब्रेसियर घालून झोपल्याने काही त्रास होतात का याबाबत तरुणी आणि महिलांच्या मनात बऱ्याच शंका असतात. त्याच शंकांची उत्तरे डॉ. अर्चनी धबन बजाज यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे.
रात्री झोपताना ब्रेसियर घालावी की नाही?
य़ाबाबत लोकांमध्ये कायमच बरेच समज-गैरसमज आहेत. ब्रेसियर घालून झोपल्याने ब्रेस्ट कॅन्सर, स्तन घट्ट होणे अशाप्रकारचे काही ना काही आजार उद्भवतील असे काहींना वाटते. मात्र अशाप्रकारचे कोणतेही संशोधन अद्याप झालेले नाही त्याबाबत कोणत्याही प्रकारचा अहवालही अद्याप समोर आलेला नाही. अशाप्रकारे ब्रेसियर घालून झोपल्याने कोणताही आजार होतो असं म्हणता येणार नाही. मात्र ती घालून झोपणे किंवा काढून झोपणे हा पूर्णपणे आपला चॉईस असतो. आपल्याला स्तनांचा शेप खराब होईल अशी भिती वाटत असेल तर काही गोष्टींकडे लक्ष देऊन आपण ब्रेसियर घालून झोपू शकतो. यासाठी झोपताना ब्रेसियर सैल करणे हा उत्तम उपाय आहे. यामुळे शेप खराब होण्याची भिती राहणार नाही आणि घट्ट घट्ट बांधल्यासारखेही वाटणार नाही.
रात्री झोपताना टाईट ब्रा घालण्याने होणारे ३ दुष्परिणाम
१. दिवसभर घट्टसर ब्रेसियर घातल्यानंतर रात्रीही आपण हिच ब्रा घालून झोपलो तर त्याच्या घट्टपणामुळे आणि घामामुळे आपल्या त्वचेला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. विशेषत: उन्हाळ्यात घामामुळे आणि स्कीनला पुरेसा ऑक्सिजन आणि मोकळी हवा न मिळाल्याने त्वचेशी निगडीत तक्रारी निर्माण होऊ शकतात.
२. आपण वापरत असलेली ब्रेसियर जास्त घट्ट असेल तर त्यामुळे नसा दाबल्या जाऊ शकतात. बरेचदा ब्रेसियरला इलॅस्टीक असते. काहीवेळा पायपिंगच्या ब्रेसियरही मुली वापरतात. यामुळे ब्रेसियरच्या आसपासची त्वचा संकुचित होते. तसेच नसांवर प्रेशर येते. त्यामुळे झोपताना शक्यतो घट्ट ब्रेसियर घालून झोपू नये.
३. रात्री झोपताना घट्ट ब्रेसियर घातली तर ब्लड सर्क्युलेशनमध्ये अडथळे येण्याची शक्यता असते. ब्रेसियरला असलेले हूक, पट्टी, अंडरवायर हे त्वचेत रुतल्याने त्वचेला इरीटेशन आणि खाज येते. तसेच अनेकदा ब्रेसियर घट्ट असेल तर पाठदुखीची समस्याही उद्भवू शकते.