पुरूष घरात आले की मोठा फॅन लावतात. रात्री झोपताना तर फॅन लावण्यावरुन घरोघरी भांडणं ठरलेली असतात. एकीकडे पुरुषांना सतत गरम होत असतं आणि फॅन किंवा एसीचे वारे हवे असते तर दुसरीकडे महिलांना या वाऱ्याचा त्रास होतो किंवा त्यांना लगेचच थंडी वाजते. इतकेच काय पण थंडीत आणि पावसाळी वातावरण पडले की महिला लगेचच स्वेटर, मोजे, मफलर घालायला लागतात. तर पुरुषांना ही हवा छान वाटत असते (Why Women Feel Cold More Than Men).आता महिलांना जास्त थंडी वाजते आणि पुरुषांना कमी प्रमाणात थंडी वाजते या विनोदाचा किंवा भांडणाचा विषय असला तरी यामध्ये काही तथ्य आहे का? अशाप्रकारे थंडी कमी-जास्त वाजण्यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत का हे समजून घेऊया...
पुरुष आणि महिलांमधील जैविक फरक
महिला आणि पुरुष एकसारख्याच वजनाचे असले तरी महिलांच्या शरीरात स्नायू कमी असल्याने उष्णता निर्माण होण्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. तसेच महिलांच्या अंगावर हाडे, स्नायू आणि त्वचा यांच्यामध्ये तुलनेने मास जास्त असते. त्यामुळे त्यांच्या त्वचेला जास्त थंडी वाजते. कारण त्वचा रक्तवाहिन्यांपासून काही अंतरावर असल्याने त्वचेला तितकी उष्णता मिळत नाही. महिलांचा मेटाबॉलिक रेट हा पुरुषांपेक्षा कमी असतो. त्यामुळे उष्णता निर्माण करण्याची क्षमता महिलांमध्ये कमी असते. म्हणूनच बाहेरचे तापमान थोडे कमी झाले की महिलांना थंडी वाजायला लागते.
हार्मोन्समध्ये असणारा फरक
महिलांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन हार्मोन्सचे प्रमाण जास्त असते. याचा त्वचा आणि शरीराच्या तापमानावर परिणाम होतो. इस्ट्रोजेनमुळे हातापायांच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. ज्यामुळे आजुबाजूच्या हवेतील उष्णता नष्ट होते आणि थंडी वाजते. तर प्रोजेस्टेरॉनमुळे त्वचेतील रक्तवाहिन्या संकुचित होतात. म्हणजे अंतर्गत अवयवांना गरम ठेवण्यासाठी काही भागात कमी रक्त वाहते, ज्यामुळे स्त्रियांना थंड वाटत राहते. महिलांना येत असलेल्या मासिक पाळीच्या काळात आणि त्याआधी-त्यानंतर या हार्मोन्सचे प्रमाण सातत्याने बदलत असल्याने महिलांना थंडी जास्त प्रमाणात वाजते. यामुळे महिलांचे हात, पाय आणि कान पुरुषांपेक्षा जास्त लवकर गार पडतात. महिलेच्या शरीरात स्त्रीबीजाची निर्मिती होते तेव्हा प्रोजेस्टेरॉनची पातळी जास्त असते त्यामुळे शरीराचे तापमान सर्वात जास्त असते. त्यामुळे या काळात महिला थंडीच्या बाबतीत जास्त संवेदनशील असू शकतात.