अनेकदा खाण्यापिण्याच्या समान गोष्टींबाबत गोंधळ उडतो. गूळ आणि साखरेचा मुद्दाही यापैकीच एक आहे. गूळ आणि साखर उसापासून बनवले जाते. परंतु, दोन्ही गोष्टी बनवण्याची पद्धत वेगळी आहे. अनेकदा लोकांमध्ये गूळ चांगला की साखर याबाबत संभ्रम निर्माण होते. साखर ही रोजच्या खाण्यातील गोष्ट आहे. पुर्वी साखरेच्या जागी गुळ वापरला जायचा. कालांतराने गुळाची जागा साखरेने घेतली. आज काही ठराविक पदार्थांमध्येच गुळ हा वापरला जातो.
यासंदर्भात, इंडियन एक्स्प्रेस या वेबसाईटमध्ये आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''गुळ आणि साखर उसाच्या रसापासून तयार होते. साखरेच्या तुलनेत गुळामध्ये अधिक फायदे आढळतात. गुळ पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने बनवली जाते. तर, साखर बनवताना केमिकलचा वापर केला जातो. साखरेत केवळ कॅलरीज असतात, याशिवाय कोणतेही उपयुक्त पोषकतत्वे नसतात. गुळामध्ये लोह (आयर्न), मॅग्नेशियम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन- B अशी अनेक आवश्यक पोषकतत्वे असतात. त्यामुळे साखर आणि गुळाची तुलना करता, आरोग्यासाठी गुळचं खाणे हितकारक ठरते.''
गुळ साखरपेक्षा कसा चांगला
आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांच्या म्हणण्यानुसार, ''शरीरात गुळाचे शोषण धिम्यागतीने होते. त्यामुळे रक्तातील साखर लगेच वाढत नाही. तर, साखर झपाट्याने शोषली जाते, याने रक्तातील साखरेची पातळी लगेच वाढते. गुळात कार्बोहायड्रेट्स तसेच खनिजे, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, तर साखर आतून पोकळ असते.
आयुर्वेदानुसार, गुळामध्ये अँटी-एलर्जिक गुणधर्म असतात, ज्यामुळे ते दमा, सर्दी, खोकला आणि छातीत जडपणा यांसह अनेक समस्यांवर उपचार करण्यास मदत मिळते. जेवणानंतर गूळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. शरीरात साचलेली विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत होते. या सर्व कारणांमुळे गुळाचे सेवन साखरेपेक्षा जास्त चांगले आहे.