उत्तम आरोग्यासाठी झोप ही अतिशय आवश्यक गोष्ट असते हे आपल्याला माहित आहे. आहार, झोप आणि व्यायाम ही आरोग्याची त्रीसूत्री आपण अनेकदा ऐकतो. रात्रीची ७ ते ८ तास झोप झाल्यास आपले आरोग्य चांगले राहते असे म्हटले जाते. पण झोप पुरेशी झाली नाही तर आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात हेही आपल्याला माहित आहे. आता हे झाले रात्रीच्या झोपेविषयी. पण अनेकांना दुपारीही झोपायची सवय असते. साधारणपणे दुपारचे भरपेट जेवण झाले की आपल्याला एक डुलकी काढायची इच्छा होते. डोळे खूप मिटायला लागतात आणि कधी एकदा झोपतो असे होते. मग आपण घरात असलो तर झोपतो. पण ऑफीसला असलो तरी १० मिनीटे डेस्कवर डोके ठेवून एक लहानशी डुलकी काढण्याची आपली इच्छा होते. आता असे दुपारचे झोपणे योग्य की अयोग्य याविषयी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र महत्त्वपूर्ण माहिती देतात. त्या म्हणतात, आयुर्वेदानुसार दुपारची झोप योग्य नाही. आता ही झोप का चांगली नाही यामागे बरीच कारणे आहेत, ती कोणती हे समजून घेऊया...
दुपारी झोपणे योग्य की अयोग्य
दुपारी झोपल्यामुळे आपल्याला कफ, शिंका येणे आणि अंगात आळस भरणे अशा समस्या निर्माण होतात. म्हणून दुपारी झोपणे शक्यतो टाळावे असे आयुर्वेदात आवर्जून सांगितले जाते. असे असले तरी उन्हाळ्याच्या दिवसांत हवेतील तापमानामुळे आपल्याला थकवा आल्यासारखे होते. अशावेळी खूपच थकल्यासारखे वाटत असेल तर १५ ते २० मिनीटे दुपारी झोपले तरी हरकत नाही.
दुपारी खूप झोप येत असेल तर त्याला पर्याय काय
दुपारी झोप घ्यायची नाही हे खरे असले तरी तुम्ही पॉवर नॅप नक्की घेऊ शकता. पॉवर नॅप घेण्याने तुमचा थकवा जाऊन तुम्ही ताजेतवाने होता. स्मरणशक्ती सुधारण्यासाठी पॉवर नॅप अतिशय गरजेची असते. तसेच मूड चांगला होण्यासाठीही, तत्परतेसाठी आणि ताण कमी होण्यासाठी पॉवर नॅप उपयुक्त ठरते. १० ते १५ मिनीटे शवासन कऱणे अशावेळी अतिशय उपयुक्त ठरते. पण तुम्ही ऑफीसमध्ये असाल आणि शवासन करु शकत नसाल तर निष्फंद भाव करावा. यामध्ये खुर्चीतच रिलॅक्स बसावे आणि आपल्या आजुबाजूच्या आवाजांकडे लक्ष द्यावे मात्र त्यामुळे डिस्टर्ब होऊ नये.
दुपारी कोण झोपू शकते
जे लोक खूप जास्त दमतात त्यांनी दुपारची झोप घेतली तरी चालते. त्यामुळे त्यांचा थकवा कमी होण्यास निश्चितच मदत होते. पण आता दुपारी किती वेळ झोप घेतलेली चांगली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ३० ते ६० मिनीटे म्हणजे अर्धा ते १ तास झोपण्यास हरकत नाही. मात्र त्याहून जास्त वेळ झोपू नये. याहून जास्त वेळ झोपल्यास तुम्हाला आळस आल्यासारखे तर वाटतेच पण याचा तुमच्या रात्रीच्या झोपेवरही परिणाम होतो. म्हणजेच दुपारच्या वेळी गाढ झोपेपेक्षा रिलॅक्सेशन जास्त महत्त्वाचे असते. १५ ते २० मिनीटे नीट रिलॅक्स झालात तर तुम्हाला तरतरी येते आणि पुढचे काम जास्त चांगले होते. पण तुम्ही खूपच थकलेले असाल तर अर्धा ते एक तास झोप घ्यायला हरकत नाही.