ब्रेस्ट हा महिलांच्या शरीराच्या, सुदृढ आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग असतो. आपला चेहरा, फिगर, केस हे सगळे परफेक्ट असावे असे आपल्याला कायमच वाटते. त्याचप्रमाणे आपले ब्रेस्टही योग्य आकारात, व्यवस्थित असतील तर आपल्या व्यक्तिमत्त्वात त्याचा नक्कीच फरक पडतो. मात्र अनेकदा तरुणींना आणि महिलांनाही आपल्या ब्रेस्टबद्दल न्यूनगंड असू शकतो. याचे कारण म्हणजे ब्रेस्ट खूप लहान किंवा खूप मोठे असणे, ब्रेस्ट ओघळलेले असणे, दोन्ही ब्रेस्ट एकसारखे नाहीत असे वाटणे. हे सगळे मुद्दे आपल्याला फारसे महत्त्वाचे वाटत नसतील तरी विशिष्ट वयातील तरुणींना याबाबत काळजी वाटते आणि अनेकदा या गोष्टीमुळे त्यांना नैराश्यही येऊ शकते. गेल्या काही वर्षात ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाणही वाढत असल्याने आपण घरच्या घरी आपल्या ब्रेस्टची तपासणी करायला हवी. आता ही तपासणी कशी करायचीयाबाबतची योग्य माहिती असेल तर केव्हाही चांगले. म्हणूनच आपले ब्रेस्ट नॉर्मल आहेत हे कसे ओळखावे याविषयी तज्ज्ञ सांगतात...
१. दोन्ही ब्रेस्टचा आकार एकसारखा नसणे
आपल्याला अनेकदा असे वाटते की आपल्या दोन्ही ब्रेस्टचा आकार एकसारखाच असतो. तर असा कोणताही नियम नाही. आपला एक ब्रेस्ट लहान आणि एक थोडा मोठा असेल तरी ते एगदीच नॉर्मल असते. त्यामुळे आपले ब्रेस्ट लहान-मोठे असतील तर काळजी कऱण्याचे कारण नाही.
२. एका ब्रेस्टच्या तुलनेत दुसरा ब्रेस्ट ओघळलेला असणे
ब्रेस्ट ओघळलेले असणे ही समस्या अनेकींना भेडसावते. यामागे विविध कारणे असतील तरी एक ब्रेस्ट दुसऱ्या ब्रेस्टच्या तुलनेत ओघळलेला असण्याची तक्रारही काही महिला करतात. पण असे असणे सामान्य आहे. आपल्या ब्रेस्टमध्ये असणाऱ्या पेशींच्या रचनेवर ही गोष्ट अवलंबून असल्याने तुम्हालाही आपला एकच ब्रेस्ट ओघळला आहे असे वाटत असल्यास त्याबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही.
३. पाळीच्या वेळी ब्रेस्टमध्ये वेदना किंवा जड वाटणे
अनेक महिलांना दर महिन्याच्या पाळीच्या वेळी दोन्ही ब्रेस्टमध्ये किंवा एकाच ब्रेस्टमध्ये काहीसे दुखल्यासारखे होते. इतकेच नाही तर पाळी सुरु व्हायच्या आधीपासून ते पाळी संपल्यानंतर काही दिवस ब्रेस्टमध्ये गाठीसारखा काही भाग असल्यासारखे वाटते. मात्र पाळी येऊन गेल्यानंतर हे अचानक जाते. अशावेळी आपल्या शरीरात होणारे हार्मोनल बदल या गोष्टीसाठी कारणीभूत असतात हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे हेही पूर्णपणे नॉर्मल असून त्याविशयी काळजी करण्याचे कारण नाही.
४. ब्रेस्टचा आकार
आपल्या ब्रेस्टचा आकार खूप लहान असला किंवा प्रमाणापेक्षा जास्त मोठा असला तर आपण ओशाळून जातो. मग हा भाग मोठा असेल तर तो लपवण्यासाठी काही ना काही उपाय केले जातात. किंवा तो लहान असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रेसियर्स वापरुन तो भाग मोठा आहे असे भासवले जाते. पण आपले ब्रेस्ट आहेत तसे चांगले आहेत हे आपल्याला एकदा मान्य झाले की हे काहीच करायची गरज नसते. त्यामुळे स्वत:वर, स्वत:च्या शरीरावर प्रेम करणे महत्त्वाचे आहे.