Join us   

दिवाळी फराळ करताना हाताला चटके कॉमनच, पण डोळे सांभाळा! डोळ्यांना इजा होण्याचे प्रमाण मोठे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2021 4:33 PM

दिवाळीच्या दिवसांत फराळ आणि साफसफाई करताना घाईगडबडीत डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. पण योग्य ती काळजी घेऊन कामे केल्यास तुमच्यावर कोणताही अपघातप्रसंग येत नाही. डोळ्यांची काळजी कशी घ्यावी यासाठी खास टिप्स...

ठळक मुद्दे फराळाचे पदार्थ करताना डोळ्यांना जपाडोळे हा अतिशय नाजूक आणि महत्त्वाचा अवयव असल्याने त्याची काळजी घेणे महत्त्वाचे स्वयंपाकघरात काम करताना डोळ्यांची काळजी घ्यायला हवी

दिवाळी जवळ आली की घरोघरी फराळाची लगबग सुरू होते. करंज्यांचे सारण करुन ठेवणे, चकलीची भाजणी भाजणे, लाडूचा रवा भाजणे आणि एकीकडे चिवड्याची तयारी. या सगळ्या धावपळीत महिलांचे स्वत:कडे मात्र दुर्लक्ष होते. एकीकडे नोकरी, रोजचा स्वयंपाक आणि इतर कामे, दिवाळीची साफसफाईची आणि त्यात फराळ हे करताना महिलांची तारांबळ उडते. मग शेवटच्या टप्प्यात घाईने फराळाचे पदार्थ केले जातात. पण आपल्या घरातील स्वयंपाकघर ही अशी जागा आहे जिथे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता सर्वाधिक असते. स्वयंपाक घरातील गॅस, सूरी, कात्री, यांसारखी शस्त्रे आणि  विविध मसाले डोळ्यांना इजा करू शकतात. त्यामुळे स्वयंपाक घरात काम करताना प्रत्येकाने डोळ्यांना हानी पोहोचू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. आता डोळ्यांची काळजी घ्यायची म्हणजे नक्की काय तर त्यासाठीच्या काही सोप्या टिप्स...

१) नियमित हात धुवा :

फराळाचे पदार्थ करताना करताना आपण बऱ्याच प्रकारच्या गोष्टी हाताळतो जसे की तेल, मसाले, ओट्यासाठी किंवा भांड्यासाठी साबण किंवा लिक्विड सोप. जर यातील कुठल्याही गोष्टींचा हात चुकून डोळ्यांना लागला तर डोळे चुरचुरणे, दुखणे, लाल होणे, पाणी येणे, काही काळ अंधूक दिसणे अशा गोष्टी घडू शकतात. हे टाळण्यासाठी डोळ्यांना हानी पोहचेल अशी वस्तू हाताळल्या नंतर लगेचच साबणाने हात स्वच्छ धुवा. वर सांगितल्याप्रमाणे कोणत्या गोष्टींना लागलेला हात डोळ्याला लागला आणि काही त्रास जाणवत असेल तर लगेचच डोळे स्वच्छ पाण्याने धुवा. अशावेळी डोळ्यांना हात लावणे, डोळे चोळणे, रुमालाने डोळा पुसणे हे त्रासदायक ठरु शकते. हा त्रास वेळीच कमी न झाल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

२) गरम तेल किंवा पातळ पदार्थ काळजीपूर्वक हाताळा :

फराळाचे बरेच पदार्थ तळावे लागतात. तसेच चिवड्यासारख्या पदार्थांना फोडणी देताना बऱ्याचदा तेल किंवा पातळ पदार्थ डोळ्यात जाण्याच्या घटना घडतात. त्यामुळे डोळा भाजणे , जखम होणे, तीव्र वेदना होणे, लाल होणे, कमी दिसणे असे त्रास उद्भवू शकतात. त्यावेळी लगेचच डोळे धुवून घ्यावेत व नेत्रतज्ञाच्या सल्ल्याशिवाय कुठलाही ड्रॉप डोळयात टाकू नयेत. शक्य असल्यास चष्म्याचा वापर करावा किंवा फोडणी देताना भांड्यावर झाकण ठेवावे.

( Image : Google)

३) धारदार शस्त्रे योग्य जागेवर ठेवा :

शंकरपाळी, करंज्या किंवा इतरही फराळाचे पदार्थ करताना सुरी, काटे चमचे, कात्री, इत्यादी वस्तू वापरल्या जातात. त्याशिवाय कॅन ओपनर किंवा इतरही गोष्टी धोकादायक असतात. घरातील लहान मुलांना या गोष्टी खेळण्यासाठी घेण्याची इच्छा होऊ शकते. या टोकदार गोष्टी डोळ्यांना लागल्यास डोळ्यांचा भाग फाटणे, डोळा सुजणे, कमी दिसणे , अशा स्वरूपाच्या गंभीर इजा होउन कायम स्वरुपी दृष्टी जाण्याची व डोळा गमवायची वेळ येऊ शकते त्यामुळे या वस्तू योग्य जागी व लहान मुलांपासून दूर ठेवाव्यात व स्वतः वापरताना देखील तितकीच काळजी घ्यावी. या वस्तू वापरताना हात तेलकट किंवा साबणाचा नसावा जेणेकरून या वस्तू हातातून निसटून डोळ्याला लागणार नाहीत.

४) घरगुती उपचार टाळा :

एखादी जखम झाली की आपण त्याठिकाणी पटकन चहा किंवा हळद लावतो. पण डोळ्याच्या बाबतीत हे घातक ठरु शकते. डोळ्याजवळ काही झाल्यास त्याठिकाणी हळद, चहा लावल्यास तो डोळ्यात जाऊन त्रास आणखी वाढू शकतो. घाईच्या वेळी आपण पटकन असे उपाय करतो पण ते काही वेळा घातक ठरु शकतात. 

५) साबण / लिक्विड सोप डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या :

दिवाळीमुळे आपण घराची साफसफाई करताना सगळी भांडी धुण्यासाठी काढतो. ही भांडी घासताना, ओटा धुताना साबण / लिक्वीड सोप डोळ्यात गेल्याने त्रास होऊ शकतो, ते वापरताना काळजी पूर्वक वापरा व शक्य झाल्यास सेफ्टी गॉगल्सचा वापर करा. 

६) किचनमधील डब्यांसाठी योग्य जागा निवडा :

मसाला, तिखट यांचे डबे जास्त उंचीवर न ठेवता हातापाशीच ठेवा. वरच्या बाजुचा डबा  काढताना तो पडून त्यातील मसाले बाहेर पडण्याची आणि ते डोळ्यात जाण्याची शक्यता असते.  पण तो हातापाशीच ठेवलेला असेल तर असे होण्याची शक्यता काही प्रमाणात कमी होऊ शकते. डब्यांवर  पदार्थांची नावे लिहा व डब्याची झाकणे व्यवस्थित बंद होतात ना याची खात्री करा.

( Image : Google)

७) योग्य अंतर पाळा :

गरम वाफ डोळ्यात गेल्यास किंवा पदार्थाची फोडणी, तेल डोळ्यात उडल्यास  चटका बसल्यामुळे डोळ्यात अपाय होऊ शकतो, त्यामुळे फराळाचे पदार्थ करताना गॅस पासून योग्य ते अंतर ठेवा.

८) पडणे टाळा‌ :

ओट्याच्या कपाटांचे उघडे दरवाजे, फरशीवर सांडलेले तेल, साबण, खराब पाय पुसणी या मुळे घसरण्याचे व पडण्याचे प्रमाण वाढते. त्यात मुक्कामार, हाडांच्या दुखण्या सोबत डोळ्याला मार बसू शकतो. त्यामुळे अशा गोष्टीमुळे पडणार नाही याची दक्षता घ्या.

९) फेस पॅक लावताना काळजी घ्या : 

दिवाळीच्या काळात सुंदर दिसण्यासाठी आपण ब्लिच करणे, वेगवेगळे फेसपॅक चेहऱ्याला लावणे असे सर्रास करतो. पण या गोष्टीतील रासायनिक पदार्थ डोळ्यात गेल्याने त्याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशाप्रकारे चेहऱ्याला फेसपॅक किंवा सौंदर्यप्रसाधने लावताना काळजी घ्या.

डॉ. ऐश्वर्या मुळे 

नेत्ररोगतज्ज्ञ 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सडोळ्यांची निगा