Join us   

डोक्यावर पांघरूण घेऊन झोपण्याची सवय चांगली की...डॉक्टर सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2023 2:12 PM

Is it healthy to sleep by covering head fully by a blanket? झोपताना अनेकांना पांघरूणाने तोंड झाकून झोपण्याची सवय असते. ही सवय कितपत घातक ठरू शकते यासंदर्भात डॉक्टर सांगतात.....

भारतातील अनेक भागात कडाक्याची थंडी पडली आहे. या थंडीमुळे माणूस बाहेर पडत नाही आहे. या दिवसात आरोग्याची योग्य काळजी घेणं आवश्यक, कारण अनेकांना आरोग्याच्या संबंधित समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी काही जण औषधोपचारासह स्वतःला गरमी देण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर करतात. तर काही लोकं रात्री झोपण्यापूर्वी पांघरूण घेतात.

प्रत्येकाची पांघरूण घेण्याची पद्धत वेगळी आहे. मात्र, काहींना डोक्यावर पांघरूण घेऊन झोपण्याची सवय असते. त्यांना डोक्यावर पांघरूण घेतल्याशिवाय झोप लागत नाही. डोक्यावर पांघरूण घेतल्याने डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखापर्यंत संपूर्ण शरीर झाकले जाते. ही सवय आपल्याला नॉर्मल जरी वाटत असली तरी देखील आरोग्यासाठी ही सवय चांगली नाही. ही सवय आरोग्याच्याबाबतीत हानिकारक मानले जाते.

नवी दिल्लीमधील एलएनजेपी हॉस्पिटलचे, पल्मनरी मेडिसिन एचओडी डॉ. नरेश कुमार यांनी या संदर्भात सांगितले की, ''जर आपण अधिक काळासाठी पांघरूणाच्या आतमध्ये तोंड झाकून झोपत असाल तर, ही बाब आरोग्यासाठी चांगली नाही. याने अल्झायमर, डिमेंशिया, अथवा ह्रदयाच्या संबधित समस्या उद्भवू शकते, हे आजार त्वरित होतील असे नाही, मात्र आरोग्याची काळजी घेणं आवश्यक.''

अल्झायमर किंवा स्मृतिभ्रंशाचा बळी ठरू शकतात

रात्रभर पांघरूणाच्या आत चेहरा झाकून झोपल्याने ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्याचबरोबर पांघरूणाच्या आत वाढलेल्या उष्णतेमुळे थकवा, डोकेदुखी यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. अनेक रिसर्चजरच्या मते, रात्रभर पांघरूणाच्या आत तोंड झाकून झोपल्याने मानसिक आरोग्य बिघडते. जे दीर्घकाळ असे करतात त्यांना देखील अल्झायमर किंवा स्मृतिभ्रंश सारखे गंभीर विस्मरणाचे आजार होऊ शकतात.

स्लीप एपनियाच्या रुग्णांसाठी अत्यंत धोकादायक

स्लीप एपनिया या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना झोपताना श्वास घेण्यास त्रास होतो. अशा लोकांचा श्वास झोपेत असताना अचानक बंद होतो आणि ते घाबरून जागे होतात. या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी पांघरूणात चेहरा  झाकून झोपणे प्राणघातक ठरू शकते. पांघरूणाच्या आत डोके झाकून झोपल्याने स्लीप एपनियाची समस्या वाढू शकते.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हृदयच्या संबधित समस्या उद्भवू शकते

आपल्या घरात जर एखाद्याला पांघरुणाच्या आत डोके ठेऊन झोपण्याची सवय असेल तर, आजच ही सवय किती घातक  ठरू शकते यासंदर्भात सांगा. याने ऑक्सिजनच्या प्रवाहावर परिणाम होतो. त्यामुळे गुदमरल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दमा किंवा हृदयविकाराने ग्रस्त लोकांसाठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स