Join us   

गुढीपाडव्याला कडुनिंब खातात त्याचं शास्त्रीय महत्त्व काय? नेमका किती खावा कडुनिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2022 8:10 AM

गुढी पाडव्याला श्रीखंडाआधी कडुनिंबाला महत्व.. समजून घ्या कडुनिंब किती, कसं आणि का खावं?

ठळक मुद्दे वसंत ऋतूत थोड्या काळासाठी थोड्या प्रमाणात कडुनिंबा खाणं महत्वाचं.कडुनिंबाची कोवळी पानं खावीत.रक्तशुध्दीकरण्यासाठी पाडव्याला कडुनिंबाचं औषधी पेय पिण्याला महत्व आहे. 

- वैद्य राजश्री कुलकर्णी  ( एम.डी आयुर्वेद, नाशिकस्थित प्रसिध्द आयुर्वेदतज्ज्ञ)

चैत्र महिना सुरु होतो तेव्हा हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल झालेले असतात. ऊन प्रचंड वाढायला लागतं. या काळात रक्त आणि त्वचेशी संबंधित विकार डोकं वर काढतात.  ते होवू नये म्हणून आहारात कडुनिंबाचा समावेश करणं गरजेचं असतं. गोवर, कांजिण्या झाल्यावर कडुनिंबाच्या पाण्यानं आंघोळ करण्याची आपल्याकडे परंपरा आहे ती कडुनिंबाची त्वचाविकारातील भूमिकाच अधोरेखित करते. कडुनिंबाचा वापर बाहेरुन केल्यास त्याचे फायदे होतात तसेच  फायदे कडुनिंबाचं सेवन केल्यानेही  होतात. कडुनिंबाच्या सेवनानं रक्त शुध्दीकरण होतं.

Image: Google

कडुनिंबाच्या सेवनाशी निगडित दोन गोष्टी आहेत. एक तर कडुनिंबाच्या सेवनाचं महत्व माहीत असूनही केवळ चव कडू लागते म्हणून कडुनिंब न खाणं तर कडू चवीचा असल्यानं तो मधुमेहात फायदेशीर किंवा मधुमेहाचा धोका टाळणारा म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कडुनिंबाचा रस रोज घेणारेही आहेत. या दोन्ही गोष्टी चुकीच्या. आहारात कडुनिंब अजिबात सेवन न करणं जितकं तोट्याचं तितकंच प्रमाणापेक्षा जास्त कडुनिंब आहारात असणंही नुकसानकारक. 

कडुनिंबाचा रस औषधी आहे असं जरी असलं तरी तो सर्वांना चालतोच असं नाही. कडुनिंबाचा रस खूप जास्त आणि खूप काळ घेतला गेला तर शरीरात रुक्षपणा/ कोरडेपणा निर्माण होतो. त्यामुळे तो सर्वांनाच चालतो असा नाही, अनेकांसाठी तो पित्त वाढवणारा ठरतो त्यामुळे कडुनिंबाचं सेवन करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणं उचित ठरतं. 

Image: Google

वसंत ऋतूत ऊन जसं वाढायला लागतं तसा कफाचा त्रास होण्याचं प्रमाण वाढतं. थंडीच्या काळात पौष्टिक पदार्थ खाल्ल्यानं शरीरात कफ साठतो, पण बाहेरच्या गार वातवरणामुळे तो शरीराबाहेर न पडता शरीरात साठून राहातो. पण बाहेरचं वातावरण जसं गरम होतं  त्या उष्णतेमुळे कफ पातळ होवून बाहेर पडायला लागतो. त्यामुळे या काळात थोड्या प्रमाणात थोड्या कालावधीसाठी कडुनिंब खाणं फायदेशीर ठरतं, म्हणून गुढी पाडव्याच्या निमित्तानं कडुनिंबाचं एक औषधी पेय पिण्याला महत्व आहे. रक्तशुध्दीकरणासाठी हे पेय गुढी पाडव्याला औषध स्वरुपात पिण्याला महत्व आहे. 

Image: Google

कडुनिंबाचं औषधी पेय

कडुनिंबाचं औषधी पेय तयार करण्यासाठी कडुनिंबाची अगदी कोवळी पानं , कडुनिंबाची नाजुकशी फुलं त्यात  थोडी कैरी, चिंच, थोडी चिंच, ओवा, जिरे, मीठ, थोडी सूंठ पावडर आणि थोडा गूळ घालून वाटून घ्यावं. हे मिश्रण थोड्या पाण्यात एकत्र करुन चांगलं हलवून घ्यावं.  नैवेद्याच्या छोट्या वाटीभर हे पेयं पिण्याला महत्व आहे. हे पेयं केवळ गुढी पाडव्याच्या दिवशी प्रतिकात्मक स्वरुपात प्यालं जात असलं तरी ते केवळ एकच दिवस पिणं उपयोगाचं नाही आणि ते कायम पिणंही फायदेशीर नाही. गुढी पाडव्यापासून पुढे किमान 5-6 दिवस हे पेयं पिणं गरजेच्ं असतं.

Image: Google

कडुनिंबाची  पानं

कोणी कडुनिंबाची पानं खातात. कडुनिंबाची पानं खाल्ली तरी चालतात. पण ती कोवळी आणि तुरट आणि कडू रस असलेली खायला हवी. पूर्ण कडू चवीची निबर पानं खाल्ली तर त्याचा शरीरातील पित्त वाढून त्रास होतो. कडुनिंबाची कोवळी पानं काही दिवस ( साधरणत: 8-10 दिवस)  खावीत. खूप दिवस खाल्ली तर त्याचा त्रास होतो. कडुनिंब खाल्लं जाणं आवश्यकच आहे पण ते थोड्या प्रमाणात आणि थोड्या काळासाठी. कडुनिंबाचं औषधी पेयं, कडुलिंबाची चटणी हे थोड्या प्रमाणात सेवन करण्याला महत्व आहे.  बाह्य स्वरुपात त्वचेवर कडुलिंबाचा नियमित वापर केल्यास त्याचा फायदाच होतो.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजनाअन्नगुढीपाडवा