सगळीकडेच सुर्य सध्या आग ओकतोय. उन्हाचा पारा एवढा वाढला आहे की डिहायड्रेशन होऊन प्रचंड थकवा येत आहे. अशा कडाक्याच्या उन्हात ज्यांना घराबाहेर पडावे लागते, त्यांना तर खूप जास्त त्रास होतोच आहे, पण घरात असणाऱ्यांनाही उष्णतेच्या झळा सोसणे कठीण होत आहे. थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, जेवण्याची इच्छा नसणे, भूक न लागणे असा त्रास तर उन्हामुळे जाणवतो आहेच, पण डोळ्यांची आगआग होते, डोळे जळजळतात (stress on eyes) अशी तक्रारही अनेक जण करत आहेत.
यातच पुन्हा आणखी एक भर पडली आहे ती स्क्रिन टाईमची. लहान मुलं असो की वृद्ध व्यक्ती. प्रत्येकाच्याच स्क्रिन टाईममध्ये (screen time) भरपूर वाढ झाली आहे. आधीच उष्णतेमुळे थकून गेलेले डोळे आणि त्यात पुन्हा वाढलेला स्क्रिन टाईम. यामुळे डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यातून गरम वाफा येत आहेत असे जाणवणे, डोळ्यांची आगआग होणे, डोळे मिटल्यावर ते गरम जाणवणे, डोळ्यातूून पाणी येणे, निस्तेज होणे अशा तक्रारी वाढलेल्या आहेत. उष्णतेमुळे डोळ्यांना होणारा हा त्रास कमी करायचा असेल तर काही घरगुती उपाय (home remedies for itching eyes) करून बघा. पण फरक पडला नाही, तर मात्र डाॅक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी.. १. पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा. शरीरातील पाणी पातळी कमी झाली तरी डोळ्यांची जळजळ होते. योग्य प्रमाणात पाणी प्यायलं तर शरीराचं तापमान नियंत्रित राहतं आणि डोळ्यांनाही थंडावा मिळतो. २. दररोज रात्री झोपताना एक ग्लास पाण्यात एक चमचा गुलकंद टाकून प्या. गुलकंदामुळे सगळ्या शरीरालाच थंडावा मिळतो. ३. अपूरी झोप हे देखील डोळ्यांची जळजळ होण्यामागचं एक कारण असू शकतं. त्यामुळे झोप पुर्ण होईल याची काळजी घ्या.
४. काकडीचे काप कापून दुपारच्यावेळी आणि रात्री झोपण्याआधी डोळ्यावर ठेवा. फ्रिजमधून काही वेळापुर्वीच बाहेर काढलेली थंडगार काकडी असेल तर आणखी चांगले. ५. त्याचप्रमाणे कापसाचा बोळा थंडगार रोझ वॉटरमध्ये बुडवा. पिळून घ्या आणि मग डोळ्यांवर ठेवा. शांत वाटेल. ६. रात्रीच्या वेळी अंधारात मोबाईल बघणे कमी करा. यामुळे डोळ्यांवर खूप ताण येतो. ७. घराबाहेर पडताना हॅट आणि चांगल्या दर्जाचा गॉगल वापरायला विसरू नका.