Join us   

पावसाळ्यात गारठ्याने सांधेदुखी सतावते? आखडलेल्या सांध्यांना आराम हवा, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात 3 सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 3:44 PM

Joint pain control Ayurveda Remedies Monsoon special : पावसाळ्याच्या दिवसांत हवेतील बदलामुळे ज्याप्रमाणे सर्दी, ताप, जुलाब या समस्या उद्भवतात त्याचप्रमाणे सांधेदुखीची समस्याही डोके वर काढते.

ठळक मुद्दे ज्या भागावर आपण तेल लावले आहे त्या भागावर गरम पाण्याच्या वाफेने किंवा गरम पाण्याने शेक देणे हा उत्तम उपाय ठरतो.वात प्रकृती असणाऱ्यांनी या काळात विशेष काळजी घ्यायला हवी म्हणजे वातामुळे होणारी सांधेदुखी कमी होऊ शकते.

सतत पडणारा पावसामुळे निर्माण होणारा ओलावा, दमट हवा, गारठा यांमुळे आपल्याला आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. साधारणपणे पावसाळ्याच्या दिवसांत हवेतील बदलामुळे ज्याप्रमाणे सर्दी, ताप, जुलाब अशा विविध समस्या उद्भवतात त्याचप्रमाणे सांधेदुखी ही पावसाळ्याच्या दिवसांत डोकं वर काढणारी आणखी एक समस्या. या दिवसांत शरीरात वाताचे प्रमाण वाढत असल्याने सांधे दुखण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे वाताचा त्रास असलेल्या व्यक्तींना पावसाळ्यात वातूळ, पचायला जड असलेले पदार्थ शक्यतो टाळलेले बरे (Joint pain control Ayurveda Remedies Monsoon special). 

एरवी आपली हाडे ठणकतात पण थोडा व्यायाम किंवा शरीराची हालचाल झाली की हे दुखणे थांबते. मात्र सांधेदुखीमध्ये शरीरातील हाडे, स्नायू सगळेच दिर्घकाळ ठणकत राहते. वात दोष शरीरात पसरत असल्याने आपली सांधे दुखतात. यावर नेमका काय उपाय करावा हे आपल्याला माहित नसते. आयुर्वेदात वात, सांधेदुखी यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. संदिप काळे आपल्याला हे सांधेदुखीवरील उपाय सांगतात. तेव्हा तुमचीही हाडे पावसाळ्याच्या काळात ठणकत असतील तर हे उपाय नक्की करुन पाहा. 

संधीवात म्हणजे काय? 

वाताची प्रकृती असणाऱ्या व्यक्तींच्या शरीरामध्ये वात निर्माण होऊ लागतो. वातामुळे बहुतेक वेळा आपल्या शरीरातील हाडांची कालांतराने झीज होऊ लागते. हाडांची झीज झाल्याने व्यक्तीला कोणत्याही शारीरिक क्रिया करताना त्रास होऊ लागतो आणि हळूहळू शरीरातील वंगण कमी होऊ लागते. शरीरातील वंगण संपले तर आपल्या सांध्याच्या कार्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि रुग्णाला अनेक शारीरिक क्रिया करणे अवघड व्हायला लागते. अशावेळी मानदुखी, कंबरदुखी, नसांवर होणारा परिणाम, उठताना–बसताना त्रास यांसारख्या समस्या डोके वर काढतात.

१. आहाराबाबत

ज्यांना वाताचा त्रास आहे अशांनी पावसाळ्याच्या दिवसांत हवेत गारठा असल्याने शक्यतो गरम पदार्थ खावेत. इतकेच नाही तर पावसाळ्यात पाणीही गरम करुन प्यायला हवे, उकळल्यामुळे पाणी पचायला हलके होते. यामुळे म्हणजे वाताचा त्रास काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असते. तसेच या काळात वातूळ पदार्थ आहारात शक्यतो टाळावेत. वात कमी झाल्यामुळे सांधेदुखी काही प्रमाणात कमी होते. 

२. आलं-लसणाचा वापर वाढवावा

आलं आणि लसूण या दोन्ही पदार्थांमध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दमट आणि गार हवेत आहारात आवर्जून आलं-लसणाचा वापर करण्यास सांगतले जाते. आल्याचा रस मधासोबत घेणे, भाजी-आमटीमध्ये लसणाचा वापर करणे, लसणाची चटणी यांचा आहारात योग्य प्रमाणात समावेश करायला हवे. त्यामुळे वेदना कमी होण्याची शक्यता असते. 

(Image : Google)

३. स्नेहन आणि स्वेदन उपचार 

स्नेहन म्हणजे विविध प्रकारच्या आयुर्वेदिक तेलाने संपूर्ण शरीराला मसाज करणे. यामध्ये आपल्याला पूर्ण अंगाला मसाज करायचा नसेल तरी आपण केवळ दुखणाऱ्या भागावर मसाज करु शकतो. स्वेदन म्हणजे ज्या भागावर आपण तेल लावले आहे त्या भागावर गरम पाण्याच्या वाफेने किंवा गरम पाण्याने शेक देणे. हा शेक आपण गरम पाण्याच्या पिशवीनेही देऊ शकतो. त्यामुळे अंग मोकळं व्हायला तर मदत होतेच पण स्नायूंना आराम मिळतो. हे उपचार आपल्याला घरच्या घरीही करता येतात, अन्यथा डॉक्टरांकडे जाऊनही हे उपचार घेता येऊ शकतात.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सघरगुती उपाय