डॉ. कल्पना सांगळे (बालरोगतज्ज्ञ) एक बातमी वाचण्यात आली. भारतात लोकांचे पॅकेज्ड फूड विकत घेण्याचे प्रमाण हे पालेभाज्या, फळे, अंडी व सुकामेवा घेण्यापेक्षा खूप अधिक आहे, पण हे आजचेच नाही, जी मुले माझ्याकडे गेल्या २५ वर्षांपासून तपासणीसाठी येत असतात त्यांना काय खायला घातले जाते ते मी आवर्जून विचारत असते. त्यात जंक फूडचे प्रमाण खूप असते. अर्थात जे आपण त्यांना पौष्टिक म्हणून खाऊ घालत आहोत तो खरा म्हणजे निकृष्ट आहार आहे हे त्या पालकांनापण माहीत नसते! अशा पालकांची मी “शाळा” घेते. त्यांना काय सांगते ते मी आज लिहीत आहे.. मुलांचा आहार आणि आईबाबा १. जंक फूड म्हणजे असा आहार ज्यात मीठ, साखर आणि पिष्टमय पदार्थ अतिप्रमाणात असतात आणि त्यांची पोषण क्षमता अत्यल्प असते. त्यात रंग चव हे बाहेरून जास्तीचे टाकले जातात. कोलावर्गीय पेय, अतिप्रमाणात साखर टाकून विकणारे फळांचे ज्यूस हेसुद्धा जंक फूडमध्ये गणले जातात. त्याचबरोबर दुधात टाकण्यासाठी चॉकलेटी पावडर ज्यात प्रचंड प्रमाणात साखर असते. कॉर्न स्टार्च आणि साखर वापरून बनवलेले कॉर्नफ्लेक्स हेसुद्धा जंक आहे हे समजून घ्यायला हवंच. २. चवीला साखर, मीठ आणि वेगवेगळे फ्लेवर्स टाकल्यामुळे जंक फूड हे खूप आकृष्ट करणारे असते. त्यामुळे मुलांना त्याचीच सवय होते. वर्षाच्या आतील मुलांना पण चॉकलेट, बिस्किटे, चिप्स, वेफर्स, नूडल्स दिले जातात. या चवीची त्यांना सवय होऊन मग घरचा वरणभात, भाजीब-भाकरी, त्यांना सपक लागते. घरचे अन्न पोटात जात नाही आणि हे बाहेरचे निकृष्ट अन्न पोटात जाते. ज्यात तंतुमय पदार्थ नसतात, त्यामुळे संडासला खडा होतो. संडास करताना खूप जोर द्यावा लागतो. शरीराच्या वाढीला आवश्यक घटक न मिळाल्यामुळे त्यांची वाढ नीट होत नाही. रक्त कमी होते आणि मग अशी मुले वारंवार आजारी पडू लागतात. ३. मीठ, साखर आणि फॅट्स जास्त प्रमाणात गेल्यामुळे अशी मुले पोटाचा घेर वाढलेली आणि वयाच्या मानाने वजन जास्त असलेली असू शकतात. पालकांना ते उलट चांगले वाटते, पण पुढे अशा मुलांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.
४. आई-वडील जर दोघेही कामाला जाणारे असतील तर त्यांचे आणि मुलांचे जंक खाण्याचे प्रमाण खूप असते. त्यात जाहिरातींचा भडिमार असतो. त्यामुळे मुलांना ब्रेड, मॅगी, बिस्किटे, खारी, टोस्ट विकतचे जॅम, सॉस हे नाश्त्याला दिले जातात. वेळ वाचवणारे अन्न म्हणून दूध बिस्किटाकडे खूप कल आहे. त्यात रेडी टू कूक किंवा रेडी टू इटच्या नावाखाली अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचा भडिमार आहे. संपूर्ण पिढीच्या पिढी अनारोग्याच्या दरीत ढकलण्याचा हा प्रकार भयानक आहे. ५. साखर, मीठ, पिष्टमय पदार्थ यांनी युक्त आणि प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे यांचा पत्ता नसलेला आहार आपण देत आहोत हे पालकांना समजायला हवे. काही प्रिझर्वेटिव्हस आणि ॲडिटिव्हिजमुळेे कॅन्सरचा धोका पण वाढू शकतो. अति प्रमाणात साखरे खाल्ल्यामुळे आज दात किडलेले नाहीत असे मूल जर पाहण्यात आले तर आश्चर्य वाटेल, अशी परिस्थिती आहे.
तर मग मुलांना खायला काय द्यावे?
१. सर्वांत प्रथम तर मुलांना आधी घरचे ताजे शिजवलेले अन्न खायला शिकवा. भाजी भाकरी किंवा चपाती, कोशिंबीर, वरण-भात, फळे, मांसाहार जे तुमच्या घरी पूर्वापार खाणे चालले आहे ते सर्व द्या ! २. नवीन बाळांना प्रयत्नपूर्वक सवय लावा आणि ज्यांना आधीच ही वाईट सवय आहे त्यांना हळूहळू यातून बाहेर काढा. ३. घरात या जंक गोष्टी आणणे बंद करा. मोठ्यांनी देखील हे खाणे बंद करायला हवे. आपले अनुकरण लहान मुले करत असतात. आपल्या डॉक्टरांशी एकदा बोलून घेऊन योग्य ती उपाययोजना नक्की करा. ४. जंक फूड विरोधातील लढा सोपा नाहीये. कारण त्याचा वापर करून जगभर चालणाऱ्या मल्टिनॅशनल कंपन्या आपला नफा कमावत आहेत. यात बळी जातोय तो आरोग्याचा ! ५. आपले आरोग्य आपल्या हातात आहे, पण ते हात मात्र सवयीने बांधले गेले आहेत. चला !या वाईट सवयी संपवून टाकू आणि आपले व आपल्या मुलांचे भविष्य आरोग्यदायी करू, असा नववर्षाचा संकल्प सर्वांनी करूयात !