आपले मन स्वस्थ असेल तर आपण दिवसभर छान फ्रेश राहू शकतो. पण मनस्थितीच अस्थिर असेल तर मात्र आपले कोणतेच काम नीट होत नाही. मन स्वस्थ असण्यासाठी आपली रात्रीची ८ ते ९ तासांची झोप चांगली झालेली असणे आवश्यक असते. गाढ झोप झालेली असेल तर आपण दिवसभर फ्रेश राहतो आणि नकळतच आपला पुढचा संपूर्ण दिवस चांगला जातो. इतकंच नाही तर दुसऱ्या दिवशी आपली सगळी कामे व्यवस्थिती आपल्या नियोजनाप्रमाणे होऊ शकतात. आता रात्री नेहमी अशी गाढ झोप येण्यासाठी नेमके काय करायचे असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर यासाठी केवळ दोनच गोष्टींची आवश्यकता असते. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र दोन गोष्टींचा मंत्र देतात, ज्यामुळे आपली झोप गाढ आणि छान होऊ शकते.
१. बेडभोवती कुंपण घाला
दिवसभर आपण सगळेच असंख्य प्रकारच्या गोष्टींसोबत असतो. यामध्ये कायम सकारात्मक गोष्टीच असतात असे नाही. तर कित्येक नकारात्मक गोष्टीही असू शकतात. रात्री झोपताना आपले मन शांत असते त्यामुळे आपल्या डोक्यात दिवसभराच्या गोष्टींचे वेगवेगळे विचार येत राहतात. यामध्ये बरेचदा नकारात्मक विचारही असतात. पण या विचारांमुळे आपली झोप डिस्टर्ब होते. त्यामुळे झोपताना हे सगळे नकारात्मक विचार बाजूला ठेवायला हवेत. यासाठी झोपताना आपल्या बेडभोवती एक काल्पनिक कुंपण घाला. म्हणजे हे विचार बेडच्या बाहेर राहतील आणि आपण सकारात्मक विचारांसोबत शांत गाढ झोपू शकू.
२. तुम्ही स्वत:सोबत राहा
जेव्हा आपण दिवसभर काम करुन रात्री बेडवर येतो तेव्हा आपण स्वत:सोबत असणे गरजेचे आहे. रात्री झोपताना तुमचे शरीर, तुमचे मन आणि तुम्ही या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तुमचे शरीर आणि मन यांकडे लक्ष द्या. श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुम्हाला गाढ झोप तर येईलच पण तुमचा दुसरा दिवसही अतिशय आनंदी आणि सुखद जाईल. त्यामुळे आजचा दिवस चांगला संपण्यासाठी आणि उद्याचा दिवस चांगला जाण्यासाठी या दोन गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा. त्याचा तुम्हाला फ्रेश राहण्यासाठी नक्कीच फायदा होईल.