Join us   

फक्त एक चांगली सवय तुमचं आयुष्य बदलून टाकेल.. सिर्फ एक अच्छी आदत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 1:51 PM

खूप काही करण्यापेक्षा एकाच गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्या..वजन वाढणे आणि कमी करणे दोन्हीसाठीही उपयोगी

ठळक मुद्दे आयुष्यात कोणतीही गोष्ट साध्य करायची असल्यास सातत्य गरजेचे...योग्य नियोजनाने कोणतीही गोष्ट अशक्य नाही, तेव्हा नियोजन नीट करा

काहींना आपलं वाढलेलं वजन कमी करायचं असतं तर काहींना कमी असलेलं वजन वाढवायचं असतं. मग यासाठी एक ना अनेक उपाय केले जातात. भरपूर व्यायाम करण्यापासून ते आहाराच्या वेगवेगळ्या पद्धतींकडे धाव घेतली जाते. मात्र वेगवेगळ्या प्रकारचे व्यायामप्रकार आणि आहारातील बदल यांमुळे लगेचच वाढलेलं वजन कमी होत नाही आणि कमी झालेलं वजन वाढतही नाही. मात्र नियमितपणे आहारात काही बदल केल्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो. विशेषत: कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी एक सवय तुम्हाला आवर्जून स्वत:ला लावावी लागते आणि ती म्हणजे सातत्य. कोणत्याही गोष्टीत सातत्य नसेल तर त्या गोष्टीचा म्हणावा तसा परिणाम होत नाही असे प्रसिद्ध आहारतज्ज्ञ नॅन्सी देहरा सांगतात. 

पुढे त्या म्हणतात, १ चांगले जेवण तुम्हाला फिट ठेऊ शकत नाही तर एक चुकीचे जेवण तुमची तब्येत बिघडवू शकत नाही. तसेच व्यायाम हा तुमचे ध्येय गाठण्यासाठीचे एकमेव माध्यम ठरु शकत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठण्यासाठी सातत्याने काही केले तर त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. तेव्हा व्यायाम, आहाराचे नियोजन यामध्ये जे कराल त्यात सातत्य ठेवण्याचा कायम प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे वजनाशी संबंधित काही बदल करायचे असल्यास खालील गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात...

- रोजच्यापेक्षा १५ मिनीटे लवकर उठा आणि तुमच्या दिवसाचे योग्य पद्धतीने नियोजन करा 

- प्रत्येक आहारात भाज्या असतील याची काळजी घ्या 

- प्रत्येक जेवणांच्या मध्ये भरपूर पाणी पीत राहा. तुमच्या टेबलावर पाण्याने भरलेली बाटली आवर्जून ठेवा. किंवा मोबाइलवर पाणी पिण्याचे अलार्म सेट करा.

- आहारात कमीत कमी प्रोसेस्ड फूडचा वापर करा. आहारात एकाहून जास्त प्रोसेस्ड फूड असायला नको याची काळजी घ्या.

- आहारातील प्रथिनांचे प्रमाण योग्य आहे ना याकडे सातत्याने लक्ष द्या. तब्येत चांगली राहण्यासाठी आहारात सर्व घटकांचा योग्य पद्धतीने समावेश असणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने आहार घ्यायला हवा. 

- तुम्हाला आवडेल असा कोणताही व्यायाम करा, त्यासाठी घराच्या बाहेरच जायची गरज आहे असे नाही, पण दिवसातील १५ मिनीटे स्वत:साठी द्या. यामध्ये तुम्ही अगदी साधे योगा, स्ट्रेचिंग, डान्स असा कोणताही व्यायामप्रकार करु शकता.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल