कोरोनाने आता पुन्हा एकदा चांगलंच डोकं वर काढलं असून आपल्या आसपासच्या अनेक जणांना कोरोना झाल्याचं ऐकू येत आहे. मुळातच रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर कोरोना (corona virus) होतो आणि कोरोना झाल्यानंतर तर उरली सुरली रोगप्रतिकारक शक्तीही खूपच कमी होऊन जाते. त्यामुळे कोरोना होऊन गेल्यानंतर, क्वारंटाईन पिरेड (quarantine) संपल्यानंतरही पुढचे काही दिवस अनेक जणांना खूपच अशक्तपणा येऊन जातो. अंगातली ताकद कमी झाल्यासारखी वाटते. कोरोनानंतर आलेला हा अशक्तपणा कमी करण्यासाठी आणि इम्युनिटी वाढविण्यासाठी कोणती योगासने आणि प्राणायम उपयुक्त ठरू शकतात, याविषयीची माहिती सेलिब्रिटी योगा ट्रेनर अंशुका परवानी (yoga trainer Anshuka Parwani) यांनी सांगितली आहे.
अंशुका यांनी इन्स्टाग्रामवर (instagram) याविषयीचे काही व्हिडिओ आणि फोटो शेअर केले असून ते चांगलेच व्हायरल झाले आहेत. अंशुका या करिना कपूर, आलिया भट, अनन्या पांडे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींच्या योगा ट्रेनर आहेत. त्यांच्यामते योगासने, प्राणायामा आणि काही ब्रीद वर्किंग म्हणजेच श्वसनाचे व्यायाम यांच्या मदतीने पोस्ट कोविड होणारा अशक्तपणाचा त्रास कमी करणे शक्य आहे.
कोरोनानंतर इम्युनिटी वाढविण्यासाठी करा ही योगासने
कपालभाती, अनुलोम विलोम आणि भ्रस्त्रिका प्राणायाम
हे प्राणायामचे प्रकार बहुतेक सर्वांनाच माहिती आहेत. हे तीन प्राणायाम नियमित केल्यामुळे फुफ्फुसांची ताकद वाढते. यामुळे त्यांची ऑक्सिजन धरून ठेवण्याची क्षमता सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. कोरोना काळात ताप कमी झाला, थोडी तरतरी वाटू लागली तर १४ दिवसांच्या आयसोलेशनमध्येही तुम्ही प्राणायाम करू शकता, असे अंशुका यांनी सांगितले आहे.
दिर्घ श्वसन (deep breathing)
कोरोनाच्या १४ दिवसांच्या आयसोलेशनमध्ये अनेक जणांना एन्झायटीचा खूप त्रास होतो. अस्वस्थता वाटते, घाबरल्यासारखे होते. टेन्शन येते. हे सगळं थांबवून एन्झायटी कमी करण्यासाठी तसेच मनातले नकारात्मक विचार काढून टाकण्यासाठी दिर्घ श्वसन करण्याचा सल्ला अंशुका यांनी दिला आहे. त्यांच्या मते दिर्घ श्वसन केल्यामुळेही फुफ्फुसांची ऑक्सिजन धरून ठेवण्याची ताकद वाढते आणि मन शांत होते.
करा हे व्यायाम आणि स्ट्रेचिंग
कोरोनानंतर खूप अशक्तपणा येतो. त्यामुळे अनेक जणांमध्ये व्यायाम करण्याएवढीही ताकद नसते. त्यामुळे योगासनांच्या काही सोप्या अवस्था आणि स्ट्रेचिंगचे काही प्रकार केले तरी नक्कीच राेगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल, असे अंशुका यांनी सांगितले. यासाठी मार्जरासन (Cat/Cow pose), बटरफ्लाय पोझ, एकपाद राजकपोत्सन (pigeon seated pose), साईड स्ट्रेचिंग आणि पवन मुक्तासन करण्याचा सल्ला अंशुका यांनी दिला आहे.
ही काळजी घ्या...
- कोविडनंतर जलद रिकव्हरी होण्यासाठी व्यायाम करा, पण शरीराला कोणताही अतिरिक्त ताण देऊ नका, सहज शक्य असेल तेवढेच करा, असे अंशुका यांनी सांगितले आहे.
- व्यायाम, स्ट्रेचिंग करताना सुरूवातीला काही सेकंदासाठीच करा आणि त्यानंतर हळूहळू वेळ वाढवा.
- प्राणायाम आणि योगासन कसे करायचे याची योग्य पद्धत माहिती असल्याशिवाय मनानेच कोणतेही व्यायाम करू नका.