कॅल्शियम हा आपल्या हाडांमधील अत्यंत आवश्यक व मूलभूत घटक आहे. आपल्या शरीरातील वेगवेगळी कार्य सुरळीत चालण्यासाठी कॅल्शियम हे अतिशय महत्वाचे असते. आपल्या प्रत्येकाच्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण हे योग्य पातळीवर असणे खूपच आवश्यक असते. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपण अनेक आजारांना बळी पडू शकतो. शरीरात कॅल्शियमची कमतरता भासू नये, यासाठी आपण आपल्या आहाराची काळजी घेणे आणि शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी झाले तर काही लक्षणे ओळखणे या दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात.
महिलांमध्ये हार्मोनल बदल आणि अनेक अनुवांशिक घटकांमुळे शरीरातील कॅल्शियमच्या पातळीवरही परिणाम होतो. सतत थकवा जाणवणे आणि स्नायूंमध्ये पेटके येणे ही कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे आहेत. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दात आणि हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. हे सामान्यतः मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये दिसून येते. महिलांमध्ये कॅल्शियमची विशेष कमतरता असते, त्यामुळे त्यांना पाठ आणि सांध्यामध्ये भयंकर वेदना होतात. अशा परिस्थितीत कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर सांगतात शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढवण्यासाठी कॅल्शियमयुक्त ६ पदार्थ (6 Calcium-Rich Foods) खाण्याचा सल्ला देतात. नेमके कोणते आहेत ते कॅल्शियमयुक्त ६ पदार्थ ? पाहूयात(Kareena Kapoor Khan's Nutritionist Rujuta Diwekar Shares 6 Calcium - Rich Food).
न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर (Nutritionist Rujuta Diwekar) सांगतात कॅल्शियम वाढवण्यासाठी रोजच्या आहारात ६ पदार्थांचा समावेश करा...
१. ड्रायफ्रुट्स व पौष्टिक बिया :- शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण योग्य पातळीवर मेंटेन ठेवण्यासाठी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर दिवसाच्या सुरुवातीला ड्रायफ्रुट्स खाण्याचा सल्ला देतात. या ड्रायफ्रूट्सच्या सोबतीलाच वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक व पोषणमूल्य अधिक असलेल्या बिया देखील आपण खाऊ शकता. ड्रायफ्रुट्स व वेगवेगळ्या प्रकारच्या बिया यांमध्ये फार मोठ्या प्रमाणांत कॅल्शियम असते. आहारात अक्रोड, अंजीर, खजूर आणि जर्दाळू यासारख्या सुक्या मेव्याचा समावेश करून आपण कॅल्शियमची कमतरता दूर करू शकतो. हा सुकामेवा रोज खाल्ल्याने आपल्या शरीराला प्रथिने, जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणांत मिळतात. ज्यामुळे आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते.
२. चणे आणि शेंगदाणे :- दोन जेवणांच्या मध्ये भूक लागल्यास किंवा संध्याकाळी टी - टाइम स्नॅक म्हणून आपण मूठभर चणे - शेंगदाणे खाऊ शकता. चणे - शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या शरीरातील कॅल्शियमची गरज पूर्ण होण्यास मदत होते.
३. डाळी व कडधान्य :- बहुतेक कडधान्ये आणि शेंगा देखील कॅल्शियमने समृद्ध असतात. भारतीय पदार्थांमध्ये संपूर्ण कडधान्ये आणि शेंगा यांचा वापर भरपूर प्रमाणांत केला जातो. मूग, मसूर, चणे, राजमा या सर्वांमध्ये भरपूर कॅल्शियम असते. हे केवळ हाडे मजबूत करत नाहीत तर मेंदू आणि दातांच्या बळकटीसाठी देखील याचा फायदा होतो.
वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...
४. घरगुती पारंपरिक पदार्थ :- शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यासाठी आपण घरगुती पारंपरिक पदार्थांचा देखील समावेश करू शकता. अगदी छोले पुरी किंवा मिसळ पावमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. ऋजुता सांगते की, पिझ्झा किंवा बर्गर अगदी घरी बनवून आपण त्यामध्ये आपले पारंपरिक आणि ऋतुनुसार बाजारांत मिळणाऱ्या फळांचा, भाज्यांचा समावेश करू शकता. शक्यतो आपल्या घरात बनवल्या जाणाऱ्या पारंपरिक पदार्थांसोबतच ज्या भागात जे पिकत त्या प्रकारचे अन्नपदार्थ खाण्यावर अधिक भर द्यावा, असा सल्ला ऋजुताने दिला आहे.
कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच....
फळं खाताना या ५ फळांच्या साली तुम्ही फेकून देत असाल तर.. फळं खाण्याचा उपयोगच नाही...
५. दुग्धजन्य पदार्थ :- लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांनाच कॅल्शियमची आवश्यकता असते. तिशीनंतर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचाही आहारात समावेश करावा. दही, चीज, तूप यांचा रोजच्या आहारात समावेश असणे शरीरासाठी चांगले असते. या सर्व गोष्टी शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करतात आणि हाडे मजबूत ठेवतात.
६. भरड धान्य :- शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण योग्य प्रमाणांत राखण्यासाठी इतर पदार्थांप्रमाणेच भरड धान्य देखील अतिशय फायदेशीर ठरतात. ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारांतील भरड धान्यांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करून घ्यावा. आपण ज्वारी, बाजरी, नाचणी पासून तयार केली जाणारी भाकरी तसेच नाचणीचा डोसा किंवा अशी अनेक पौष्टिक भरड धान्य वापरून त्यांची पीठ तयार करून त्यांचे लाडू बनवून खाऊ शकतो. या भरड धान्यांचा आहारात समावेश केल्यास शरीरातील कॅल्शियमची कमतरता असल्यास ती भरून निघते.