‘वजन वाढतंच चाललंय, काय करावं कळेना’, ‘काहीही केलं तरी माझं वजन काही कमी होत नाही.’ असे एक ना अनेक संवाद आपल्या सध्या कानावर पडत असतात. कधी वर्क फ्रॉम होममुळे तर कधी कामाच्या ताणामुळे अधिक खाल्ल्याने, कधी व्यायामाचा अभाव आणि बैठी जीवनशैली यामुळे वजन वाढता वाढता वाढे होत जाते. मग एका टप्प्यावर हे वाढलेले वजन आटोक्यात येण्यासाठी नेमके काय करावे हे आपल्यातील अनेकींना कळत नाही. साधारणपणे २० व्या वर्षापासून वजन वाढायला सुरुवात होते ते वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत हे वजन वाढत जाते. वर्षाला अर्धा किंवा एक किलो वजन वाढले तरी एक वेळ अशी येते की तुम्ही लठ्ठ् व्यक्तींमध्ये गणले जाता. आता हे सगळेच वजन केवळ तुम्ही जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे वाढत नाही. तर खाण्याच्या काही चुकीच्या सवयींमुळे त्यात दिवसागणिक वाढ होत जाते.
दिवसाला १०० ते २०० अनावश्यक कॅलरीजची भर शरीरात पडल्याने चरबी आणि पर्यायाने वजन वाढते. आहारात आणि इतर काही गोष्टी करुन आपण हे वाढणारे वजन निश्चितच आटोक्यात आणू शकतो. यासाठी दररोज वाढलेल्या १०० ते २०० कॅलरीज जाळणे किंवा नेहमीपेक्षा १०० ते २०० कॅलरीज कमी खाणे असे उपाय असू शकतात. याला ‘स्मॉल चेंज अॅपरोच’ म्हटले जाते. अमेरिकेतील लठ्ठपणातज्ज्ञ जेम्स हिल यांनी २००४ मध्ये ही संकल्पना मांडली. लोकांचे वाढते वजन कमी व्हावे हा त्यामागील मुख्य उद्देश होता. या संकल्पनेचा लठ्ठ लोकांचे वजन कमी होण्यात उपयोग झाला असून त्याबाबत सर्वेक्षणही करण्यात आले होते. आता हे ‘स्मॉल चेंज अॅपरोच’ म्हणजे नेमके काय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे, पाहूयात काही सोपे उपाय...
१. चिप्स तुमच्यापासून दूर ठेवा - जेवणाबरोबर किंवा इतरवेळीही कोणत्याही प्रकारचे चिप्स खाणे हे तुमच्या कॅलरीज शेकडोने वाढवू शकतात. त्यामुळे जेवताना आणि एरवीही चिप्स तुमच्यापासून दूर ठेवा. त्याऐवजी सॅलाडचा पर्याय नक्कीच उत्तम ठरु शकतो.
२. डाएट पेयांचा समावेश करा - तुम्ही घेत असलेल्या पेयांपेक्षा आरोग्यासाठी उपयुक्त पेय घेणे केव्हाही चांगले. त्यासाठी तुम्ही आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. पण तुम्हाला तसे नको असेल तर चहा, कॉफी यापेक्षा तुम्ही साधे पाणी प्यायले तरी चालेल. कारण चहा, कॉफीसारखी पेये तुमच्या कॅलरीजमध्ये साधारणपणे १५० कॅलरीजची वाढ करतात.
३. तेलाचा कमीत कमी वापर - स्वयंपाक करताना तेलाचा कमीत कमी वापर होईल यादृष्टीने प्रयत्न करा, एकावेळी एका पदार्थासाठी एक चमचा तेल पुरेसे असते. त्यामुळे स्वयंपाक करताना तेलाबाबत योग्य ती काळजी घेतलेली केव्हाही चांगली. यामुळे तुमच्या वाढलेल्या कॅलरीज नियंत्रणात येण्यास नक्कीच मदत होईल.
४. गोड खात असाल तर अर्धे उद्यासाठी ठेवा - गोड पदार्थांमध्येही कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुम्ही एखादा गोड पदार्थ, चॉकलेट असे काहीही खात असाल तर आज त्यातले अर्धेच खा. अर्धे उद्यासाठी राखून ठेवा. त्यामुळे आजच्या कॅलरीजचे विभाजन होईल.
५. पिष्टमय पदार्थांवर नियंत्रण ठेवा - साबुदाणा, बटाटा, भात यांसारखे पिष्टमय पदार्थ तुमच्या कॅलरीज वाढण्यासाठी कारणीभूत असतात. तेव्हा हे पदार्थ खात असाल तर नेहमीपेक्षा थोडे कमी खा.
६. बेकरीचे पदार्थ बंद करा - बेकरीमध्ये तयार केले जाणारे पाव, केक, बिस्कीट हे पदार्थ आहारातून वर्ज्य करा. याचा नक्कीच फायदा होईल.
७. फोनवरील काम चालताना करा - बरेचदा व्यायामाला वेळ मिळत नाही असे कारण सांगितले जाते. मात्र हल्ली आपली अनेक कामे ही फोनवर असतात. तुमचे स्क्रीनसमोरील काम झाले की फोन कराल तेव्हा चालत राहा. जेणेकरुन तुमचे कामही होईल आणि चालण्याचा व्यायामही होईल.
८. कामे शक्यतो चालत करा - तुम्हाला घरातील काही वस्तू आणायच्या असतील, कुत्र्याला फिरायला न्यायचे असेल किंवा आणखी काहीही कामे असतील तर शक्यतो ती चालत करा. त्यामुळेही तुमच्या कॅलरीज नकळत बर्न होतील आणि तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.