७ नंतर किचन बंद ही गोष्ट खरोखरंच अतिशय अवघड आहे. कामाच्या वेळा सांभाळताना प्रत्येकासाठी अशी लाईफस्टाईल फॉलो करणं सोपं नाही. बहुतांश घरांमध्ये असं चित्र असतं की ७ च्या नंतरच महिला स्वयंपाक घरात जातात आणि मग तिथून पुढे रात्री जेवणात काय करायचं याचा विचार सुरू होतो आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरूवात होते. ज्या महिला वर्किंग वुमन आहेत, त्यांची गोष्टी तर अजूनच वेगळी. ७ वाजता तर अनेक वर्किंग वुमन तर घरी सुद्धा पोहोचलेल्या नसतात. मग कसा काय स्वयंपाक करायचा आणि कसं काय ७ वाजेपर्यंत जेवणं उरकायचं, हा प्रश्न तर अगदीच साहजिक आहे. पण तरीही जर भविष्यात आपल्याला अनेक आजारांना टाळायचं असेल, तर ७ वाजता जेवण उरकलं पाहिजे, असं तज्ज्ञ सांगतात.
आपण सगळेच जाणतो की रात्री उशिरा जेवण करणं आणि त्यानंतर लगेचच झोपणं हे आपल्या तब्येतीसाठी किती हानिकारक आहे. तरूण वयात याचे खूपच कमी परिणाम तब्येतीवर जाणवतात. पण चाळीशीनंतर मात्र तारूण्यातल्या याच सगळ्या सवयी विविध आजारांच्या माध्यमातून आपले उग्र रूप दाखवायला सुरुवात करतात. रात्री उशिरा होणारे जेवण हेच अनेक आजारांचे मुख्य कारण आहे. त्यामुळे जर भविष्यात गंभीर आजारांचा सामना करायचा नसेल, तर तरुण असतानाच काही सवयी बदला आणि फिट रहा.
रात्री ७ वाजता का जेवावे? आपले वय जसजसे वाढत जाते, तसतशी आपली चयापचय क्रिया थोडी शिथील होत जाते. त्यात जर आपल्याला रात्री उशिरा जेवायची सवय असेल, तर आपली चयापचय क्रिया अधिकच मंदावते. चयापचय क्रिया चांगली झाली नाही, तर खाल्लेलं अन्न आपल्याला व्यवस्थित पचत नाही. अन्नाचे व्यवस्थित पचन झाले नाही, तर शरीरात अतिरिक्त मेद साचत जातो. यामुळे स्थूलता, लठ्ठपणा तर येतोच, पण हृदयविकार, रक्तदाब असे अनेक त्रास देखील होऊ लागतात.
साधारण रात्री १० वाजेपर्यंत झोपले पाहिजे, असे सांगण्यात येते. पण आपण जेवणच ९ च्या दरम्यान करतो. जेवण केल्यावर लगेचच तासाभरात झोपण्याची वेळ येते. आयुर्वेदानुसार रात्रीचे जेवण आणि झोप यांच्यामध्ये ३ तासांचे अंतर असणे गरजेचे आहे. पण आपल्याकडून हे अंतर पाळले न गेल्याने रात्री जेवणाचे व्यवस्थित पचन होत नाही आणि अनेक आजारांना आमंत्रण मिळते. म्हणूनच ७ वाजेपर्यंत जेवण आणि त्यानंतर १० वाजता झोप, अशी आदर्श जीवनशैली पाळण्याचा प्रयत्न निदान ज्यांना शक्य आहे, त्यांनी तरी केलाच पाहिजे.
उशिरा जेवण केल्याने होऊ शकतात हे आजार - रोजच रात्री उशिरा जेवण करत असाल, तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचा धोका खूप जास्त असतो, असे तज्ज्ञ सांगतात. आजकाल तरुण वयात हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. ऐन तारुण्यात हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणेही आपण पाहतो. रात्री उशिराचे जेवण हे कदाचित त्यामागचे कारण असू शकते. - प्रौढ व्यक्तींनी रात्री ७ नंतर सहसा काहीही खाऊ नये. - लवकर जेवल्यामुळे अन्न व्यवस्थित पचते आणि चयापचय क्रियेत अडथळा येत नाही.
- रात्रीच्या जेवणानंतर दोन तासांच्या आतच झोपी जाणे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. - रात्री झोपल्यानंतर आपले ब्लड प्रेशर किमान १० टक्क्यांनी खाली आलेले असते. - जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी आणि विशेषत: हृदयासाठी किती घातक आहे, हे आपण जाणतोच. पण यापेक्षाही खूप जास्त नुकसान रात्री उशिरा जेवल्याने होऊ शकते.