आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर नेहमीच आपली जीवनशैली आणि सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. हाडांना शरीराला पोषण मिळण्याासाठी, वजन कमी करण्यसाठी, कंबरदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी तसंच इतर अनेक दैनंदीन जीवनातील विषयांवर व्हिडीओ शेअर करतात. अलिकडेच ऋजूता यांनी किचन टिप्सचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. यात तब्येतीसाठी ५ किचन टिप्स सांगितल्या आहेत.
१) पारंपारिक पद्धतीनं जेवण बनवा
जेव्हा तुम्ही काकडी, टोमॅटो, गाजर अशा कच्च्या भाज्या खाता तेव्हा नुसते स्लाईस करून खाण्यापेक्षा त्यापासून कोथिंबीर, सॅलेडसारखे इतर पदार्थ बनवून त्याचे सेवन करा. नुसते काप खाण्यापेक्षा पारंपारिक पद्धतीनं कोशिंबीर बनवून खाल्ल्यास त्यातील पोषक घटक तुम्हाला मिळतात याशिवाय चवही चांगली लागेल. दूधी, बटाटा या भाज्या डाएटच्या नावाखाली नुसत्या उकळून खाण्यापेक्षा पारंपारिक पद्धतीनं फोडणी देऊन, डाळी, मसाले घालून बनवल्यास त्याचे जास्त फायदे मिळतील. मसाल्यांमधील मायक्रो न्यूट्रीएंट्स शरीराला पोषण मिळण्यास फायदेशीर ठरतात.
२) घरच्याघरी दही बनवा
घरी दही बनवण्यासाठी सिरॅमिक्सची भांडी वापरा. यासाठी कोमट दूधात एक ते दोन थेंब दह्याचे थेंब घाला आणि ढवळा नंतर ४-५ तासांसाठी तसंच ठेवून द्या. जर तुम्हाला सकाळी दह्याचे सेवन करायचे असेल तर रात्री दही लावा आणि रात्री हवं असेल तर सकाळी दही लावा. नेहमी ताजं दही खाण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही बाहेरून दही आणता तेव्हा त्यात प्रोबायोटिक गुणधर्म असतीलच असं नाही.
३) होममेड स्नॅक्स तयार ठेवा
लाडू, मठरी, खारी पुरी असे पदार्थ घरीच तयार केलेले तयार ठेवा. कारण आपण सगळेच कोणत्या ना कामात व्यस्त होतो. त्यामुळे प्रत्येकवेळी खायला काहीतरी बनवायला वेळ नसतो. त्यामुळे हेल्दी नाष्ता घरीच तयार ठेवा. चिवडा, पुरी यांसारखे संध्याकाळच्या नाष्त्याचे पदार्थ तयार ठेवल्यास भूक लागल्यानंतर खाता येऊ शकतात.
४) वेगवेगळ्या आकाराच्या भांड्याचा वापर
वेगवेगळ्या आकाराच्या कढया, पातेल्या असाव्यात. कारण जर कमी लोकांचे जेवण बनवायचं असेल तर लहान भांड्याचा वापर केला जाऊ शकतो. जेणेकरून अन्न वाया जाणार नाही.
५) डाळी ठेवण्यासाठी काचेच्या बरण्यांचा वापर करा
डाळी ठेवण्यासाठी काचेच्या बरण्यांचा वापर करू शकता. यामुळे कोणत्या बरणीत काय ठेवलंय हे सहज कळतं. मिसळ, उसळ, उपमा तयार करण्यासाठी कडधान्यांचा वापर सहज करता येऊ शकतो. आहारात वेगवेगळ्या कडधान्यांचा, डाळींचा समावेश असायलाच हवा. कारण यामुळे आहारात विविधता येऊन शरीरातील पोषक घटकांची कमतरता दूर होते.