Join us   

Kitchen Tips : किचनच्या टाईल्स रोज अस्वच्छ, चिकट होतात?; या टिप्सनं मिळवा चकचकीत, नव्या टाईल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 6:43 PM

Kitchen Tips : अनेकदा खूप घासलं तरी काही डाग जात नाही. अस्वच्छतेमुळे आजार वाढत जातात त्याच वेगळं टेंशन. अशावेळी रोजच्यारोज किचन स्वच्छ ठेवण्यासाठी काही टिप्स वापरणं गरजेचं आहे. 

ठळक मुद्दे तुमच्या घरातील टाईल्स सतत चिकट होत असतील तर व्हिनेगर हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे.दोन टाईल्सच्या मधल्या रेषांमध्ये अडकलेला मळ, घाण काढून टाकण्यासाठी तुम्ही वापरात नसलेल्या टूथब्रशचा वापर  करू शकता किंवा कपडे धुण्याच्या ब्रशनंही टाईल्स स्वच्छ करता येऊ शकतात.

स्वयंपाकघर रोज कितीही स्वच्छ केलं तरी पुन्हा तसाच पसारा आणि घाण होते. लादी, गॅस, ओटा आपण पुसून स्वच्छ करून घेतो पण किचनच्या टाईल्सकडे लवकर लक्ष जात नाही. रोज जेवण बनवताना पदार्थांच्या वाफेमुळे, पाणी, तेल उडाल्यानं, टाईल्सवर चिकटपणा येतो. दुर्लक्ष केलं तर दिवसेंदिवस  हे डाग जास्तच घाणेरडे दिसतात आणि किचन फार अस्वच्छ दिसतं. अनेकदा खूप घासलं तरी काही डाग जात नाही. अस्वच्छतेमुळे आजार वाढत जातात त्याच वेगळं टेंशन. अशावेळी रोजच्यारोज किचन स्वच्छ ठेवण्यासाठी काही टिप्स वापरणं गरजेचं आहे. 

व्हिनेगर

तुमच्या घरातील टाईल्स सतत चिकट होत असतील तर व्हिनेगर हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. दोन कप विनेगर घ्या आणि त्यात दोन कप पाणी मिसळा हे मिश्रण एका स्प्रेच्या बाटलीमध्ये भरून घ्या. त्यानंतर काही वेळाने हा स्प्रे स्वयंपाक घरातील चिकट टाइल्सवर मारा थोडावेळ टाईल्स तसेच ठेवा. नंतर एखाद्या स्वच्छ कापडाच्या मदतीनं तुम्ही टाईल्स स्वच्छ करा यासाठी तर तुम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागणार नाही. व्हिनेगरमुळे टाईल्सवरचे डाग सहज निघून जाण्यात मदत होईल. 

ब्लीच

स्वयंपाकघर फारच अस्वच्छ दिसत असेल तर ब्लीच हा त्यावरचा उत्तम उपाय आहे. पाणी आणि ब्लीच सम प्रमाणात एकत्र करून घ्या. हे त्यानंतर  गोलाकार हात फिरवत टाइल्सवर कपड्याच्या मदतीनेच हे मिश्रण लावून घ्या. थोडावेळ तसंच ठेवून स्वच्छ कापडानं पुसून घ्या. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही या मिश्रणाने जेव्हा साफसफाई करणार असाल या तेव्हा हातात हॅण्ड ग्लोव्हज  घालायला विसरू नका. जर तुम्हाला ब्लीचची जास्त एलर्जी असेल तर वापर न केलेलाच बरा. 

हायड्रोजन पॅराक्साइड 

अनेकदा टाइल्सचे कोपरे काळे होतात किंवा त्यात बारीक बारीक कणांची घाण साचते. त्यासाठी गरम पाण्यात हायड्रोजन पॅराक्साइड मिक्स करुन त्याची घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट कोपऱ्यांवर लावा आणि ब्रशने घासून घ्या. अर्ध्या तासाने गरम पाण्याने बाथरुम स्वच्छ धुवून घ्या.

साबणाचं पाणी

व्हिनेगर, ब्लीच यांपैकी काहीच घरात उपलब्ध नसेल तर साबणाचं पाणी हा किचनच्या स्टाईल्स साफ करण्यसाठी चांगला उपाय आहे. एका मगमध्ये स्वच्छ पाणी घ्या, लिक्विड सोप किंवा साबण थोडासा घालून व्यवस्थित ढवळून घ्या.  हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरा त्यानंतर अस्वच्छ टाईल्सवर स्प्रे करा.   १० मिनिटांनी एक स्वच्छ कापडानं किंवा स्पंजच्या साहाय्यानं टाईल्स स्वच्छ करून घ्या. दोन टाईल्सच्या मधल्या रेषांमध्ये अडकलेला मळ, घाण काढून टाकण्यासाठी तुम्ही वापरात नसलेल्या टूथब्रशचा वापर  करू शकता किंवा कपडे धुण्याच्या ब्रशनंही टाईल्स स्वच्छ करता येऊ शकतात.

टॅग्स : अन्नहेल्थ टिप्सआरोग्यमहिला