किचन ट्रॉली म्हणजे आपल्या किचनमधील वस्तू ठेवण्याची महत्त्वाची जागा. या ट्रॉलीज बाहेरुन कितीही स्वच्छ दिसत असल्या तरी आतून मात्र त्या सतत खराब होतात. वेगवेगळ्या प्रकारची भांडी असणाऱ्या या ट्रॉलीज सतत स्वच्छ (How to clean kitchen trolleys) करणे शक्य नसते. ट्रॉलीमध्ये घाण झाली की त्याठिकाणी फिरणारी झुरळं आलीच. पण आरोग्याच्यादृष्टीने अशाप्रकारे भांड्यांमध्ये झुरळे फिरणे घातक असल्याने त्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. कितीही उपाय केले तरी थोडे दिवसांनी पुन्हा तीच परिस्थिती येते. वेगवेगळ्या प्रकारचे डबे, खाऊ किंवा उरल्यासुरल्या सामानाचे पुडे, ताटं, वाट्या, ग्लास, बरण्या, कप-बशा अशा एकाहून अनेक गोष्टी असलेल्या या ट्रॉली साफ तर ठेवायला हव्यात. पाहूयात ट्रॉली साफ (Cleaning Tips) ठेवण्याचे काही सोपे उपाय....
१. अनेकदा आपण घाईत धुतलेली ओली भांडी किचन ट्रॉलीमध्ये ठेवतो. मात्र त्यामुळे या ट्रॉलीचे मेटल गंजण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणतेही भांडे पूर्णपणे वाळल्याशिवाय अजिबात ट्रॉलीमध्ये ठेवू नये.
२. एका बाऊलमध्ये १ चमचा मीठ, १ चमचा बेकींग सोडा, १ चमचा डिशवॉश लिक्विड आणि १ चमचा लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. भांडी धुवायच्या स्क्रबरने ट्रॉलीज हळूवारपणे घासा. त्यानंतर एकदा ओल्या फडक्याने आणि एकदा कोरड्या फडक्याने या ट्रॉलीज धुवून घ्या. स्क्रबरऐवजी तुम्ही हे ब्रशनेही धुवू शकता. मात्र कमीत कमी पाणी लागेल याची काळजी घ्या.
३. अनेकदा ट्रॉली जुन्या झाल्या की त्याला गंज लागतो. त्यामुळे त्याचे मेटल दिवसेंदिवस खराब होत जाते. अशावेळी सगळी भांडी काढून कापसावर किंवा एखाद्या कपड्यावर खोबरेल तेल घेऊन हे फडके किंवा कापूस ट्रॉलीमध्ये फिरवा. त्यामुळे ट्रॉलीज चकचकीत दिसण्यास मदत होईल.
४. अनेकदा डब्यातून किंवा बरणीतून मीठ, तीळ, मसाला, तिखट किंवा साखर यांसारखे लहान आकाराचे पदार्थ घेताना ते आपल्याकडून सांडतात. ते वेळच्या वेळी साफ केले नाहीत तर त्याला मुंग्या, झुरळे लागतात. मात्र हाताशी एक लहान आकाराचा झाडू ठेवल्यास हे सांडलेले वेळच्या वेळी साफ करता येते. त्यामुळे आपला नंतर साफ करण्याचा त्रास वाचतो. बाजारात हल्ली अशाप्रकारचे झाडू, ब्रश अगदी सहज उपलब्ध असतात.
५. ट्रॉलीच्या खाली मेटलचे मटेरीयल असल्याने वेगवेगळ्या गोष्टी पडून ते खराब होते. असे खराब होऊ नये म्हणून आपण त्याखाली कधी वर्तमानपत्रे किंवा कधी प्लास्टीक शीट घालतो. मात्र सध्या बाजारात ट्रॉलीच्या कप्प्यांमध्ये घालण्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या आणि मटरीयलच्या शीट मिळतात. या शीट विकत घेऊन आपण आपल्या घरातील ट्रॉलींच्या मापानुसार कापून त्यात घालू शकतो. या शीट धुण्यासारख्या असल्याने ठराविक कालावधीने त्या काढून स्वच्छ धुता येतात. त्यामुळे ट्रॉली सतत साफ ठेवण्याचे काम वाचते आणि स्वच्छताही राहते.