Join us   

पंचविशीतच गुडघेदुखी? का दुखतात पाय रोज, ही कशाची लक्षणं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2021 11:52 AM

गुडघेदुखी ही पूर्वी वय झाल्यावर उद्भवणारी समस्या आता कमी वयातच उद्भवायला लागली आहे. असे होऊ नये म्हणून नेहमीच्या जीवनशैलीत काय बदल कराल?

ठळक मुद्दे वयाच्या पन्नाशीत गाठणारा हा आजार आता तिशीतच युवापिढीला गाठतमहिला ओट्यापुढे उभ्या राहिल्याने, सतत कष्टाची कामे केल्याने गुडघे दुखू शकतात

ऐन पंचविशीतच तुमची उठलेलं बसता येईना आणि बसलेलं उठता येईना अशी अवस्था झाली असेल तर सावधान. या गोष्टीकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे हे समजून घ्या गुडघेदुखी एकदा मागे लागली की लागली. ज्या मुलींना हा त्रास आहे त्यांना हे नेमके लक्षात येईल. मागे लागलेल्या या गुडघेदुखीमुळे ना धड चालता येतं ना उभं राहता येतं ना खाली बसता येतं. त्यामुळे दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो. दैनंदिन कामेच कशीबशी होत असताना बाहेर जाणे, कार्यक्रमांना उपस्थित राहणे यांसारख्या गोष्टींवर बंधने येतात. कोणाकडे लिफ्ट नसेल तर अडचण येते, तर कधी टेबल-खुर्चीची सोय नसेल तर गैरसोय. गुडघेदुखीच्या तीव्र वेदनांमुळे अनेकदा आपल्याला अवघडून टाकणारे प्रश्न उद्भवतात. ही समस्या कमी वयात उद्भवली तर आणखीनच लाजल्यासारखे होते. आता यामध्ये दोन प्रकार पाहायला मिळतात. एक क्रॉनिक दुखणे म्हणजेच जुने दुखणे तर एक तात्पुरते दुखणे. एखाद्या किरकोळ अपघाताने उद्भवलेले तात्पुरते दुखणे अनेकदा व्यायाम, औषधोपचार यांनी बरे होते. पण हे दुखणे जर दिर्घकाळचे असेल तर मात्र ते बरे होण्यास बराच कालावधी जावा लागतो. 

काही वेळा औषधोपचारांनी हे दुखणे बरे न झाल्यास शस्त्रक्रिया करण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. मागील काही काळापासून गुडघेदुखीची समस्या असणाऱ्यांची संख्या तर वाढली आहेच पण वयाच्या पन्नाशीत गाठणारा हा आजार आता तिशीतच युवापिढीला गाठतो. विशेषत: महिलांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणत उद्भवत असल्याचे चित्र आहे.  बदलत चाललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव व योग्य व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत असल्याचे आढळून येते, सांध्यांचे दुखणे, गुडघेदुखी हे त्यातीलच एक. लिफ्टचा वापर, सतत गाडीवर फिरणे, खाण्याच्या चुकीच्या पद्धती यांमुळे हे दुखणे कमी वयात डोके वर काढते. लठ्ठपणा हेही गुडघेदुखीचे एक महत्त्वाचे कारण आहे. अनेकदा महिला दिर्घकाळ ओट्यापुढे उभ्या राहिल्याने, सतत कष्टाची कामे केल्याने गुडघे दुखू शकतात. तर तुम्ही वापरत असलेली पादत्राणे योग्य नसतील, घराची फरशी कडक असेल तर टाचा आणि त्यानंतर गुडघे यांचे दुखणे मागे लागते. तेव्हा या सगळ्या गोष्टींबाबत वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.

( Image : Google)

ऑस्टीओआर्थ्रायटीस ही महिलांमधील गुडघेदुखीची मोठी समस्या आहे. वेगवेगळ्या कारणांनी गुडघ्याची झीज झाल्याने ही समस्या उद्भवते. आधी थोडेफार दुखणारे गुडघे एकाएकी जास्त दुखायला लागतात. अशावेळी काय करावे ते सुचत नाही. हे दुखणे थांबावे म्हणून डॉक्टर सुरुवातीला वेदनाशामक औषधे देतात. तर काही औषधांनी वेदना व सूज कमी होण्यासही मदत होते. याबरोबरच तेल किंवा क्रिममुळेही गुडघेदुखीच्या समस्येवर तात्पुरता आराम मिळू शकतो. याबरोबर बर्फाने शेकण्यास सांगितले जाते. याबरोबरच डॉक्टर फिजिओथेरपिस्टकडे जाण्याचा सल्लाही देतात. फिजिओथेरपिस्ट आपण घरच्या घरी करु शकतो असे व्यायाम शिकवतात तर काही वेळी वेगवेगळ्या मशिनच्या माध्यमातून व्यायाम करुन घेतले जातात. हे सर्व उपाय वेळीच योग्य पद्धतीने केल्यास या दुखण्यापासून आराम मिळू शकतो. रुग्णाला काय त्रास होतो हे विचारुन डॉक्टर गुडघेदुखीचे निदान करतात. परंतु रुग्णाला नेमके सांगता येत नसेल किंवा डॉक्टरांचे समाधान होत नसेल तर नेमके निदान करण्यासाठी एक्स-रे, सिटी स्कॅन, एमआरआय या तपासण्या केल्या जातात. आमवात किंवा काही वेगळ्या कारणाने ही गुडघेदुखी उद्भवली असल्यास काही वेळेस रक्ताच्या तपासण्याही कराव्या लागतात.

( Image : Google)

गुडघेदुखी होऊ नये म्हणून... 

१. लठ्ठपणामुळे गुडघ्याच्या सांध्यांवर ताण येतो, त्यामुळे वजन आटोक्यात ठेवणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे. 

२. नियमित चालण्याचा व्यायाम अतिशय गरजेचा आहे. गुडघेदुखी उद्भवू नये म्हणून प्रत्येकाने दररोज किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम करणे आवश्यक आहे. 

३. लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांनी चढ-उतार करा. यामुळे गुडघ्यातील वंगण चांगले राहण्यास मदत होते आणि गुडगेदुखीला तुम्ही दूर ठेऊ शकता. 

४. हाडांची झीज योग्य पद्धतीने भरुन निघाल्यास अशाप्रकारचे दुखणे उद्भवत नाही. यामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश ठेवावा. दूध-दुधाचे पदार्थ, मासे, अंडी, सुकामेवा यांसारख्या पदार्थांमुळे हाडांची झीज भरुन काढण्यास मदत होते. 

५. सकाळच्या कोवळ्या उन्हात ‘ड’ जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असते. शरीराला ‘ड’ जीवनसत्व मिळाल्याने हाडांमध्ये कॅल्शियम पुरेशा प्रमाणात शोषले जाते. 

६. गुडघ्यांना मार लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. 

७. सतत ओट्यापुढे किंवा इतर ठिकाणी उभे राहून काम असल्यास अर्धा तासाने ५ मिनिटे खाली किंवा खुर्चीत बसावेय यामुळे गुडघ्यांना आराम मिळू शकतो.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स