Join us   

मातीच्या भांड्यात अन्न शिजवा, अन्नातून मिळते जास्तीचे पोषण; रिसर्चचा दावा, मातीची भांडी वापरा कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2023 4:29 PM

Know benefits of cooking food in clay pot : आजकाल कढई, वेगवेगळ्या प्रकारचे पॉट, डाव, हंडी यांसारखी अतिशय सुंदर आकाराची मातीची भांडी मिळतात..

मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याची पूर्वीची फॅशन गेल्या काही वर्षात पुन्हा आली आहे. पूर्वीच्या काळी माणूस प्रगत अवस्थेत नव्हता तेव्हा तो लाकडाच्या, मातीच्या भांड्यातच अन्न शिजवत असते. जसा काळ पुढे गेला आणि प्रगती होत गेली तसा धातूचा शोध लागला आणि धातूपासून विविध अवजारे, भांडी तयार करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर प्रामुख्याने तांबे आणि पितळ्याची भांडी वापरात आली. आता तर काच, स्टेनलेस स्टील, अॅल्युमिनिअम, लोखंड, चिनी माती अशा विविध प्रकारांत भांडी तयार केली जातात. या प्रत्येक भांड्याच्या वापराची पद्धत, त्यातील पदार्थांना येणारी चव वेगळी असल्याने आपण आवडीनुसार आणि सोयीनुसार भांड्यांचा वापर करतो (Know benefits of cooking food in clay pot).

(Image : Google )

 मातीची भांडी फॅशन म्हणून वापरली जात असली तरी त्यात स्वयंपाक करणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर असते. मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यास लोह, फायबर, कार्बोदके, फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाणही अन्नपदार्थात फार मोठ्या प्रमाणात राखले जाते, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. मातीच्या भांड्यात असणारे लहान छिद्र आग आणि ओलावा समान रीतीने सगळीकडे पसरण्यास मदत करतात ज्यामुळे अन्नातील पोषक तत्त्व सुरक्षित राहतात.नव्या संशोधनानुसार, मातीच्या भांड्यात अन्न शिजवून खाल्यास कुपोषणाचे प्रमाण कमी होऊ शकते, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. 

(Image : Google )

भारतात आजही महिला आणि लहान मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण जास्त असून स्वयंपाकासाठी मातीच्या भांड्यांचा वापर केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो. जयपूरच्या अमृत माटी इंडिया ट्रस्टने केलेल्या संशोधनात मातीत विविध प्रकारचे पोषक घटक असतात. त्यामुळे मातीच्या भांड्यांमध्ये अन्नपदार्थ शिजवल्यामुळे ते अधिक पोषक होतात. एवढेच नव्हे, तर महिलांमधील अॅनिमिया तसेच खनिजांची कमतरता दूर करण्यासही मदत होईल. मातीच्या भांड्यात क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने अन्नातील पीएच पातळी संतुलित राखता येते. त्यामुळे पचन योग्य पद्धतीने होण्यास मदत होते. आजकाल कढई, वेगवेगळ्या प्रकारचे पॉट, डाव, हंडी यांसारखी अतिशय सुंदर आकाराची मातीची भांडी बाजारात उपलब्ध असून आपल्या कुटुंबाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपण या भांड्याचा निश्चितच वापर करु शकतो.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स