खारे दाणे, भुईमुगाच्या शेंगा, दाणे आणि गूळ किंवा अगदी दाण्याचा लाडू हे पूर्वी अगदी सहज खाऊ म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या गोष्टी. प्रोटीन, लोह यांचा उत्तम स्त्रोत असलेले हे दाणे लहान मुलांना आवर्जून हातावर खाऊ म्हणून दिले जायचे. मात्र आता सुकामेवा खाण्याचे फॅड आल्याने शेंगदाण्याचे महत्त्व नकळत कमी झाले आणि भरपूर पोषण मूल्य असणारे शेंगदाणे काहीसे मागे पडले. पण दाण्यांमधील फॅटस, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम हे सगळे घटक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. म्हणूनच आपण स्वयंपाकात आवर्जून दाणे, दाण्याचा कूट, दाण्याची चटणी यांचा वापर करतो. पण कच्चे दाणे पचायला थोडे जड असल्याने ते भाजून किंवा पाण्यात भिजवून खायला हवेत असे आवर्जून सांगितले जाते (Know benefits of soaked peanuts for health).
भाजणे किंवा तळण्यापेक्षाही भिजवलेले दाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. हे दाणे आरोग्याला कशाप्रकारे उपयुक्ट ठरतात याविषयी असल्याचे आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. सकाळी झोपेतून उठल्यावर, मधल्या भूकेच्या वेळी म्हणजेच ११ वाजता किंवा ५ वाजता अशाप्रकारे भिजवलेले दाणे खाणे फायदेशीर ठरते. दाणे घरात सहज उपलब्ध असल्याने त्यासाठी फार वेगळे काही करावे लागते असेही नाही. त्वरीत ऊर्जा आणि ताकद देणारा हा पारंपरिक खाऊ आपण आहारात आवर्जून घ्यायला हवा.
१. दाण्याच्या सालांमध्ये फायटेटस नावाचा घटक असतो. दाणे पाण्यात भिजवल्याने या घटकाचा प्रभाव कमी होतो आणि दाणे पचायला जास्त हलके होतात.
२. दाण्यातील मोनोसॅच्युरेटेड फॅटस आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅटस शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास उपयुक्त ठरतात. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
३. शरीरातील उष्णता टिकून राहण्यासाठी दाणे फायदेशीर असतात. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होण्यास मदत होते.
४. दाण्यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅसेस यांसारख्या तक्रारींपासून दूर राहण्यास दाणे खाणे उपयुक्त ठरते.