सकाळी लवकर केलेल्या पोळ्या डब्यात भरल्या की वातड किंवा ओलसर होऊ नयेत म्हणून आपण त्या फॉईल पेपरमध्ये गुंडाळतो. हॉटेलमधून किंवा आणखी कुठून पार्सल आणतानाही पोळी, भाकरी, ब्रेड फॉईलमध्येच गुंडाळला जातो. यामुळे हे पदार्थ बराच वेळ गरम आणि चांगले राहतात असे आपल्याला वाटते. कमीत कमी जागा व्यापणारा आणि परफेक्ट पॅकींग होणारा म्हणून हा फॉईल पेपर ओळखला जातो. लहान मुलांना शाळेसाठी किंवा मोठ्यांना ऑफीससाठी डबा देतानाही याचा सर्रास वापर केला जातो. मात्र आरोग्याच्यादृष्टीने हा फॉईल पेपर वापरणे अजिबात योग्य नाही (Know How Aluminum Foil Paper for Packing food Is Dangerous for Health).
अॅल्युमिनियम फॉइलचा जास्त वापर केल्याने अन्नाचा pH बदलू शकतो आणि आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. इंटरनॅशनल जर्नल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सायन्स (International Journal of Electrochemical Science) यांनी केलेल्या अभ्यासानुसार फॉईल पेपरमधील अॅल्युमिनीअमचे कण या पदार्थात मिसळले जातात. जे लोक रोज फॉइल वापरतात त्यांच्या शरीरात अॅल्युमिनियम तत्वाचे प्रमाण वाढते आणि यामुळे मज्जासंस्था, मेंदू आणि हाडं, किडणी खराब होतात. अल्झायमर, डीमेन्शियासारखे आजार होऊ शकतात. तसेच मानसिक आरोग्यावरही या फॉईल पेपरचा गंभीर परीणाम होतो. टोमॅटो, लिंबू, मसालेदार पदार्थ अॅल्यूमिनिअम फॉईलमध्ये बांधल्यास ते आरोग्यासाठी जास्त घातक असते.
फॉईल पेपरला पर्याय काय?
पोळी, भाकरी किंवा पराठा देण्यासाठी सुती कापडाचा वापर करणे हा उत्तम पर्याय आहे. मात्र हे कापड वापरल्यानंतर प्रत्येक वेळी धुवावे लागते. तसेच बटर पेपर हा उत्तम पर्याय होऊ शकतो. बटर पेपरची अन्नासोबत कोणतीही रिअॅक्शन होत नसल्याने तो वापरणे आरोग्याच्यादृष्टीनेही अतिशय सोयीचे असते. बटर पेपरच्या वापरामुळे पदार्थांमधील ओलावा टिकून राहतो आणि जास्तीचे तेलही शोषले जाते. जर आपल्याला खूप मसालेदार, खारट आणि व्हिटॅमिन सी युक्त अन्नपदार्थ पॅक करायचे असतील तर त्यासाठी बटर पेपरचा वापर करणे केव्हाही सोयीचे ठरते. बटर पेपर अॅल्युमिनियम फॉइलपेक्षा जास्त तापमान सहन करू शकतो त्यामुळे आपण गरम अन्नपदार्थदेखील बटर पेपरमध्ये रॅप करुन ठेवू शकतो.