थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा मिळावी आणि पोषण व्हावे यासाठी आपण आहारात काही बदल करतो. यामध्ये आपण शरीराला उष्णता देणारे पदार्थ तर खातोच. पण गरम आणि ताकद वाढवणारे पदार्थही खातो. यामध्ये तीळ, डिंकाचे लाडू, गूळ, सुकामेवा या गोष्टींचा समावेश असतो. सुकामेवा खाणे आरोग्यासाठी उत्तम असल्याने थंडीच्या काळात आणि एरवीही लहान मुलांना आणि सगळ्यांनाच सुकामेवा खाण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. मात्र हा सुकामेवा खायचा म्हणजे तो नक्की कसा खाल्ला तर आपल्याला त्याचे पूर्ण फायदे होतात, तो किती प्रमाणात खायचा आणि कोणत्या वेळेला खाल्लेला जास्त चांगला याबाबत आपल्याला माहिती असायला हवी. तसेच सुकामेव्यातील कोणते घटक आरोग्यासाठी जास्त ताकद देणारे असतात अशी माहिती असेल तर आपण घेत असलेल्या आहारातूनजास्तीत जास्त चांगले फायदे मिळण्यास मदत होते. आयुर्वेदाचे अभ्यासक असलेले कपिल त्यागी यांनी सुकामेवा खाण्याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याशी शेअर केल्या आहेत त्या कोणत्या पाहूया (Know How and when to Eat Dryfruits for good Result)...
१. बदाम - बदाम हा सुकामेव्यातील सर्वात जास्त पौष्टीक घटक मानला जातो. वात आणि पित्त दोष दूर होण्यासाठी याचा चांगला फायदा होतो. बुद्धी चलाख होण्यास याची चांगली मदत होते.
२. खजूर - खजूर जास्त प्रमाणात गोड असल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यास फायदेशीर असतात. पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी आणि वात, पित्त दोष दूर करण्यासाठी खजूराचा उपयोग होतो.
३. बेदाणे - शरीर मजबूत ठेवण्यासाठी आणि त्वचेच्या तक्रारी दूर करण्यासाठी बेदाणे फायदेशीर ठरतात. प्रकृतीने थंड असल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यास याचा चांगला उपयोग होतो.
४. आक्रोड - हेल्दी फॅटचा उत्तम स्त्रोत असल्याने कमी प्रमाणात खाल्ले तरी याचे चांगले फायदे होतात. मेंदूचे काम चांगले चालण्यासाठी आक्रोड खाण्यास सांगितले जाते.
सुकामेवा खाण्याची योग्य पद्धत, वेळ कोणती?
रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी सुकामेवा खायला हवा. यामुळे ते पचायला हलके होतात आणि त्यातील उष्णता कमी होण्यास मदत होते. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या किंवा संध्याकाळी ५ वाजता स्नॅक्स घेतो त्यावेळी सुकामेवा खायला हवा. रात्री उशीरा सुकामेवा खाणे टाळावे कारण ते पचायला जड असल्याने पचनशक्तीवर ताण येऊ शकतो. एकावेळी खूप जास्त न खाता एक सुकामेवा ३ ते ४ इतक्याच प्रमाणात खायला हवा.