महिलांमध्ये कधी अचानक थायरॉईड ग्रंथींची वाढ होते तर कधी लठ्ठपणाची समस्या भेडसावते. विविध कारणांनी होणारे हार्मोन्समधील बदल, पाळीच्या तक्रारी यांसारख्या गोष्टींचा कमी-अधिक फरकाने सगळ्यांनाच सामना करावा लागतो. थोडे काही झाले की डॉक्टरांकडे जाऊन भरमसाठ गोळ्या-औषधे घेण्यापेक्षा पूर्वापार चालत आलेल्या आयुर्वेदिक उपायांचा वापर अनेकदा फायदेशीर ठरु शकतो. आयुर्वेदात बऱ्याच औषधांमध्ये वापरली जाणारी आणि उपयुक्त अशी अश्वगंधा महिलांशी निगडीत काही सामान्य तक्रारींवर उपयुक्त असते. अश्वगंधामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीइन्फ्लमेटरी, अँटी स्ट्रेस, अँटी बॅक्टेरीयल आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे बरेच गुणधर्म असतात. त्यामुळे कित्येक वर्षांपासून आयुर्वेदात या वनस्पतीचा वापर केला जातो. पाहूयात अश्वगंधाचे महिलांसाठी असणारे फायदे...
१. थायरॉइडवर उत्तम उपाय
महिलांमध्ये पुरुषांपेक्षा थायरॉईडचे प्रमाण जास्त असते. अशावेळी अश्वगंधा घेतल्यास त्याचा थायरॉईड कमी होण्यास निश्चित फायदा होतो. उंदरांवर केलेल्या एका संशोधनातून याचा थायरॉईडवर उपयोग होत असल्याचे समोर आले आहे. हायपोथायरॉईड असणाऱ्या रुग्णांसाठीही अश्वगंधाचा उपयोग होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
२. शारीरिक संबंध सुधारण्यास उपयुक्त
पुरुष आणि महिलांनाही अनेकदा शारीरिक संबंधांबाबतच्या तक्रारी असतात. या गोष्टींबाबत आपल्याकडे आजही मोकळेपणाने बोलले जात नाही. मात्र संबंधांमध्ये उत्तेजना मिळणे, संबंधांनंतर समाधान मिळणे यांसारख्या गोष्टींवर अश्वगंधा फायदेशीर ठरते.
३. वजन कमी करण्यास फायदेशीर
आहाराच्या चुकीच्या पद्धतीस बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव यांमुळे गेल्या काही वर्षात लठ्ठपणा ही एक मोठी समस्या झाली आहे. लठ्ठपणामुळे भविष्यात हृदयरोग, डायबिटीस, ब्लडप्रेशर यांसारख्या समस्या उद्भवतात. अश्वगंधामध्ये अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण जास्त असल्याने मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे शरीरातील अनावश्यक फॅटस बर्न होतात. रक्तातील साखरेची पातळी आणि ट्रायग्लिसराइडस नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
४. ताण कमी होण्यास मदतशीर
अश्वगंधामध्ये असलेले काही गुणधर्म हे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे महिलांना अनेकदा नैराश्य, भिती वाटणे किंवा ताण येणे अशा समस्या उद्भवतात. यावर उपाय म्हणून अश्वगंधा अतिशय उत्तम काम करते. ज्यांना अशाप्रकारच्या समस्या उद्भवतात त्यांना अश्वगंधा घेण्याचा सल्ला आयुर्वेदतज्ज्ञ देतात.
५. पाळी नियमित करण्यासाठी मदत
पाळी वेळच्या वेळी न येण्याची समस्या सध्या अनेक महिलांमध्ये दिसून येते. यामागे विविध कारणे असली तरी पाळी वेळच्या वेळी येणे आरोग्याच्यादृष्टीने केव्हाही चांगले असते. पाळीतील अनियमितता, जास्त प्रमाणात होणारा रक्तस्त्राव, पोट आणि कंबरदुखी, वंध्यत्व यांसारख्या समस्या उद्भवतात. वेगवेगळ्या ताणांमुळेही महिलांना या समस्यांचा सामना करावा लागतो. हार्मोन्सचे असंतुलन हे यामागील एक मुख्य कारण असू शकते. अशावेळी अश्वगंधा अतिशय उपयुक्त ठरते.