नाभीमध्ये किंवा बेंबीत तेल घालणे याला आपल्याकडे अतिशय पारंपरिक महत्त्व आहे. मूल जन्माला आल्यापासून त्याच्या बेंबीत तेल घालण्याची पद्धत आहे. त्याचे आरोग्याला बरेच फायदे होतात असे सांगितले जाते. हे तेल घालायचे हे जरी खरे असले तरी ते नेमके कधी, कसे आणि कोणते घालायचे याबाबत योग्य ती माहिती असायला हवी, अन्यथा त्याचा म्हणावा तसा फायदा होत नाही. आपल्या शरीरात एकूण ७२ हजार नाडी असून या सगळ्या आपल्या नाभीशी जोडलेल्या असतात. त्यामुळे नाभीमध्ये तेल घातल्याने संपूर्ण शरीराचे पोषण होते. द योगिनी वर्ल्ड या इन्स्टाग्राम पेजवर जूही कपूर यांनी याविषयी अतिशय महत्त्वाची अशी माहिती दिली असून नाभीमध्ये तेल सोडण्याचे नेमके कोणते फायदे होतात पाहूया (Know how Belly oiling or Navel Oiling is beneficial )...
नाभीत तेल लावताना...
१. तेलाची निवड कशी करायची? - नाभीत तेल घालण्यासाठी नारळाचे, बदामाचे किंवा ऑलिव्ह यांसारखे नैसर्गिक तेल वापरायला हवे.
२. तेल कसे लावायचे? - सामान्य तापमानाला तेल हलके गरम करा आणि मगच लावा.
३. मसाजसह हलक्या हाताने लावा - बोटांवर तेल घेऊन ते गोलाकार हात फिरवून लावायला हवे. खालच् बाजूला ओटीपोटापासून मसाज सुरू करा आणि नाभीमध्ये वरच्या दिशेने जा.आता मधल्या किंवा अनामिकेने नाभीत तेल लावा.
फायदे
१. त्वचा मुलायम ठेवते
गर्भधारणेदरम्यान त्वचेला येणारी खाज, कोरडेपणा यांवर नाभीत तेल घालण्याने फायदा होतो आणि त्वचा मुलायम राहते.
२. आराम मिळतो
नाभीमध्ये तेल घालून मसाज केल्याने ताण निघून जाण्यास मदत होते आणि निरोगीपणाची भावना वाढण्यास याची चांगली मदत होते.
३. स्ट्रेच मार्कस जाण्यास फायदेशीर
नाभीत नियमित तेल लावल्यास गर्भधारणेदरम्यान किंवा अन्य काही कारणाने स्ट्रेच मार्क्स आले असतील तर ते जाण्यास मदत होते.
४. रक्ताभिसरण सुधारते
पोट आणि नाभीला तेलाने मसाज केल्याने या भागातील रक्ताभिसरणाची क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. त्याचा एकूण आरोग्याला चांगला फायदा होतो.